मराठी ही आमची माऊली* *अभिजात भाषेची सावली* *२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिन*





लेखक - रणवीर राजपूत*

माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके!परी अमृतातेंही पैंजा जिंके! महाराष्ट्राचे थोर सुपुत्र,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर उर्फ कविश्रेष्ठ कुसूमाग्रज यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन! कविवर्य कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या सर्वांगी विकासासाठी जे मोलाचं योगदान दिलं आहे,त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांचा जन्म दिवस हा *मराठी राजभाषा  दिन* म्हणून साजरा केला जातो.ही खऱ्या अर्थानं त्यांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच आहे.प्रख्यात साहित्यिक पु. ल.देशपांडे म्हणतात," पंढरीचा पांडुरंग हे जसं महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत आहे,त्याप्रमाणेच कुसुमाग्रज हे राज्याचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक ठेवा आहे.चला तर,माय मराठीच्या संवर्धनासाठी तसेच मराठीपण व मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वजण एकदिलानं कटिबद्ध होऊया.

भाषेच्या श्रेष्ठत्वाविषयी सांगतात," भाषा ही सर्वार्थाने प्रबळ आहे.ती एक महाशक्ती आहे.पण तिच्या सामर्थ्या विषयी साशंक असलेली तिची अपत्ये मात्र दुबळी आहेत".तथापि बंधूभगिनीनो, अजूनही वेळ गेलेली नाही,जागे व्हा अन् आपल्या मराठी भाषेची महिमा साऱ्या जगाला अवगत व्हावी,यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी संघटितपणे प्रयत्नांची शिकस्त करूया.

१मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.महाराष्ट्र राजभाषा अधिनियम-१९६४ नुसार मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अमलात आली.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजेच २०१० साली मराठी विभागाची मंत्रालयात निर्मिती करण्यात आली.मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणं,हे या विभागाचं मुख्य धोरण आहे.सदर धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी,या उद्देशाने मराठी भाषा विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था,भाषा संचालनालय,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ हे विभाग कार्यरत आहेत.इतकेच नव्हे तर,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,मराठी भाषा गौरव दिन,वाचन प्रेरणा दिन ह्या कार्यक्रमांचे आयोजन राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करत असते.

भाषा हे संवादाचे माध्यम असून,आपले विचार व अनुभवांना प्रगट करणारा सुयोग्य मार्ग आहे.त्याद्वारे आपल्या जीवनाची जडणघडण होत असते.मराठी भाषेची थोरवी गातांना कविवर्य सुरेश भट म्हणतात,*आमुच्या मना मनात दंगते मराठी,आमच्या रगारगात रंगते मराठी,आमच्या उराउरात स्पंदते मराठी,आमुच्या नसा नसात नाचते मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म -पंथ-जात एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय म्हणतो मराठी*.

वास्तविक पहाता,कुसुमाग्रज हे माणसात माणूसपण रुजविण्यासाठी व त्याला निर्भय बनविण्यासाठी आपल्या काव्यपंक्तीत सांगतात,*गगनापरी जगावे, मेघापरी मरावे,तिरावरी नदीच्या, गवतातूनी उरावे* याशिवाय किनारा,समिधा,मराठी माती, हिमरेषा,रसयात्रा,छंदोमयी,मुक्तायन,स्वगत आदी कुसुमाग्रजांचे काव्य संग्रह मराठी क्षितिजावर खूप गाजले आहेत.ज्ञानेश्वरांनी तर मराठीला अमृताची उपमा दिली आहे.*अमृतासारखी वा त्याहूनही गोड असलेली माझी - तुमची माय मराठी*  *माझा मऱ्हाठीचि बोलू कौतुके,परी अमृतातेंही पैजा जिंके,ऐसी अक्षरें रजिकें ,मेळवीन!*

कविवर्य कुसुमाग्रज हे माय मराठीसमोर आदरानं नतमस्तक होत असतं.ते म्हणतात,*मराठी भाषेच्या मस्तकावर राजमुकुट आहे,पण तिच्या अंगावरची वस्त्रे मात्र फाटलेली आहेत. खरं तर,आपली विधिवत प्रतिष्ठापना होईल,या आशेने *ती मंत्रालयाच्या पायथ्याशी ताटकळत उभी आहे*. या विधानाचा मराठी जनमानसाने अवश्य विचार करून आपले डोळे उघडतं,मराठीला ज्ञानभाषा बनविण्यात तनमनधनाने योगदान द्यावे,असे आवाहन मराठी भाषेच्या दिनी करण्यात येते.भाषावार प्रांत रचना झाल्यापासून प्रत्येक राज्याने आपापल्या प्रांतीय भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन राजसिंहासनावर बसविलं.परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आजही दोलायमान आहे.कारण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा,यासाठी *ती* नव महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून प्रतिक्षेत आहे.मराठी भाषेची अस्मिता जपून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,यासाठी शासकीय पातळीवर सर्वंकष प्रयत्न होणे काळाची गरज आहे,हे समजून घेऊन राज्यकर्त्यांनी त्या दिशेने खंबीर पावलं उचलावीत,हाच मराठी जनमानसाचा आग्रह आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला आज सहा दशकाहून अधिक काळ लोटला आहे.इतक्या प्रदीर्घ काळात आपल्या विविध पक्षांच्या राज्य सरकारांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला नाही,हे उचित नव्हे.गेल्या १५ वर्षांत केंद्राने संस्कृत,तेलगू,कन्नड, मल्याळम,ओडिसा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,पण सुमारे अडीच हजार वर्षांची जुनी- समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठीला अद्यापपावेतो अभिजात भाषेचा दर्जा न मिळणे,या गोष्टीची मराठी मनाला खंत आहे.

राज्य शासनाच्या मराठी विभागाने आता ज्यादा वेळ न दवडता,मराठी या राज्य भाषेवर होणारे इंग्रजी-हिंदी भाषांचे अतिक्रमण थांबविणे काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने बालवयापासूनच मुला मुलींचे शिक्षण आपल्या मातृभाषेत व्हावं,या दृष्टीने मराठी माणसाने ठोस पावलं उचलावीत.तात्पर्य,इंग्रजी येणं आवश्यक वाटत असले तरी,मातृभाषेत लिहिणं बोलण्यात तरबेज असणं त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे,हे विसरता कामा नये.इंग्रजी भाषेशी हात मिळवणी करणे,म्हणजे मातृभाषेकडे पाठ फिरविणे होय.यावर विचारमंथन होणं तितकेच आवश्यक आहे.

खरं सांगायचं झालं तर,थोडी फार आर्थिक परिस्थिती  चांगली झाली की,स्वतः मराठी माणूस हा आपल्या पाल्यांना मराठी माध्यम  ऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दाखल करण्यास पसंती दर्शवितो,हे कितपत योग्य आहे,याचा संबंधित पालकांनी अवश्य विचार करावा.आपण परक्या भाषेला सन्मान देऊन आपल्या माय मराठीला अवहेरत आहोत,ही क्लेशजनक गोष्ट आहे.असं करून आपणच मराठीची पाळेमुळे खोदून काढत आहोत,हे वास्तवात सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण आहे,याचं इंग्रजी माध्यमाचं आकर्षण असलेल्या मराठी भाषिक पालकांनी भान ठेवावं.कारण यामुळे *मराठीपण* लयास जाऊन,त्यातून माय मराठीला उतरती कळा लागत आहे.महत्वाचे म्हणजे मुंबानगरीत तर दिवसंदिवस मराठीचा टक्का कमी होत चालला असून,त्याजागी गुजराथी, यू. पी.,बिहार,दक्षिण भारतीय,बंगाली आदींचे संख्याबळ वाढत जाणं,ही चिंताजनक बाब आहे.याशिवाय एक मराठीद्वेषी नेता मुंबई हायकोर्टात पिटिशन दाखल करून मागणी करतो की,नॉनमराठी शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती दूर करावी.याचा अर्थ ज्या थाळीत खायचं,त्यातच छेद करण्याचा असेच म्हणणे उचित ठरेल.आपण ज्या राज्यात लहानाचे मोठे झालोत,त्याचे भान *त्या* नेत्याने ठेवावे,अशी आमची अपेक्षा आहे.

 असं म्हणतात की,मुंबईत रोज अन्य राज्यातील सुमारे १०० कुटुंबे उदरनिर्वाहासाठी आपापल्या राज्यातून मुंबईत स्थलांतर करत असतात.ही मराठी भूमिपुत्रांसाठी चिंतेची बाब आहे.यास्तव परप्रांतीय लोंढे थांबविणं अत्यंत आवश्यक असून,त्यासाठी  शासनस्तरावर एक ठोस सनदशीर नियमावली बनविणं अत्यंत गरजेचं आहे.

मराठी या राजभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,या उद्देशाने मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील  महाविकास आघाडी सरकारकडून दरवर्षी केंद्राला निवेदन देऊन यासंदर्भात विनंती केली जात आहे.तथापि,अद्यापपर्यंत त्यावर योग्य तोडगा निघालेला दिसत नाही.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मराठी भाषा मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी प्रधान सचिव श्री.भूषण गगराणी व  शिष्टमंडळातील अन्य सदस्यांसह केंद्रीय मंत्री श्री.जी.किशन रेड्डी यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी मराठी भाषा मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना  निवेदन देऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा,अशी मागणी केली.याशिवाय राज्यातल्या साहित्य,कला,संगीत आदी क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या सुमारे ४,००० पत्रांचा संच देखील याप्रसंगी मंत्रीमहोदयांना सुपूर्द करण्यात आला.खरं पहाता,मराठी लोकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत की,या वर्षी आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल.कारण केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री.जी.किशन रेड्डी यांनी या भेटीत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येते.मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर हा दुग्धशर्कराचा योगच म्हटला जाईल.माय मराठी चिराऊ होवो!जय 🚩महाराष्ट्र!💐🙏

*लेखक - रणवीर राजपूत*
निवृत्त वरिष्ठ सहा.संचालक,प्रसिद्धी विभाग,मंत्रालय


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने