*तालुक्यातील मुद्रा कर्ज त्वरित वितरित करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*




शिरपूर प्रतिनिधी /= येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा व्यवस्थापकांकडून मुद्रा कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने बेरोजगार तरु णांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, बँकेने गरजू लाभार्थींना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षा व बेरोजगार तरुणांनी उपविभागीय अधिकारी व आमदार काशीराम पावरा यांच्याकडे केली आहे. बेरोजगार गरजू तरुणांना कुठलेही तारण न ठेवता व्यवसायाकरिता सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या तीन टप्प्यातील मुद्रा कर्ज योजनेत बँक शाखाधिकाऱ्यांकडून तोंड पाहून कर्ज देण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे अनेक पात्र तरुणांवर अन्याय होऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांसाठी शासनाची ही योजना मृगजळ ठरली आहे.शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यातील मुद्रा कर्ज योजनेत अनुक्रमे ५० हजार ते ५ लाख व ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्जमर्यादा ठेवण्यात आली आहे. ही कर्ज योजना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने प्रसारमाध्यमातून योजनेची जनजागृतीदेखील केली. नियमानुसार विहित नमुन्यात अर्ज भरून त्यासह व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट जोडून बँकेकडे अर्ज सादर करायचा, त्यानंतर बँक कागदपत्रांची पडताळणी करून कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे कळविण्यात आले. प्रत्यक्षात जेव्हा अनेक सुशिक्षित तरुणांनी बँकेकडे धाव घेतली, तेव्हा बँक व्यवस्थापकांनी अनेक कारणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. दुसरीकडे याचा गैरफायदा घेणारे निर्माण झाले असून, बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी ओळख असणाऱ्या मंडळींनी या योजनेवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. थातुरमातुर उद्योगाचे कोटेशन, कागदपत्र जमा करीत कर्ज उचलणे सुरू केले आहे. यामुळे खऱ्या व पात्र लाभार्थींना कर्ज मिळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. ज्या तरुणांकडे कर्ज उपलब्धतेकरिता गहाण ठेवण्याची क्षमता नाही अशा तरुणांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजनेला येथील राष्ट्रकृत बँकांच्या व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे घरघर लागली असून, इतर योजनेप्रमाणेच या योजनेचे दिवाळे निघण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासन कृषी कर्ज वाटपाबाबत आढावा घेऊन अंकुश ठेवते, त्याच पद्धतीने प्रशासनाने मुद्रा लोनबाबत बँक व्यवस्थापकांना ठरावीक उद्दिष्ट देऊन त्याचा वारंवार आढावा घ्यावा व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी मागणी येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, धुळे जिल्हा सचिव स्वप्नील जाधव, तालुका उपाध्यक्ष मनोज राजपूत, युवा तालुकाध्यक्ष विजय कोळी, नितीन जाधव , महेंद्र पाटील ,राजेंद्र पाटील, राहूल चव्हाण, नैनेश अग्रवाल , व बेरोजगार तरुणांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने