धुळे, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : बालविवाह ही सामाजिक समस्या आहे. बालविवाहामुळे मुलींचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारी येवून पडते. बालविवाह रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. पोलिस दलाच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या.
महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, पोलिस ठाण्यात कार्यरत भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांना दिलासा देण्याचे काम करावे. पतीला नोटीस देण्याचा कालावधी शक्य होईल तेवढा कमी करावा. तसेच नोटीस दिल्यावर संबंधित उपस्थित राहत नसेल, तर गुन्हे दाखल करावेत. भरोसा सेलकडे येणाऱ्या महिलांना किमान कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे संबंधित महिलेला रोजगाराचे साधन उपलब्ध होवून ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल. तसेच महिला व बालविकास विभागाने अशा महिलांसाठी ‘स्वाधार गृह’ प्रस्ताव सादर करावा. यावेळी अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी महिलांविषयक गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला. अपर पोलिस अधीक्षक श्री. बच्छाव यांनी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
Tags
news
