नाशिक=नाशिक शहरात मकरसंक्रातीच्या पर्वावर पवित्र अशा रामकुंडावर स्नान करण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे स्पष्ट केले असतानाही , स्थानिक तसेच परप्रांतीय भाविकांनी याकडे दुर्लक्ष करत गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले . या उत्सवाला महिला वर्गाकडून वाण दिले जात असल्याने दिवसभर गोदावरी परीसरात याठिकाणी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती . गर्दी होऊ नये यासाठी पंचवटी पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर लावलेले बॅरिकेट्स कुचकामी ठरत होते . महाराष्ट्रा मध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे पौष महिन्यात सूर्य आश्लेषा नक्षत्रातून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हणतात . या दिवशी गंगा स्नान , जप , तप , दानधर्म , ध्यान धारणा तसेच दानाला फार महत्व आहे . नाशिकची पवित्र नदी गंगा गोदावरी मध्ये स्नान करण्यासाठी संपूर्ण भारतभरातील तसेच नाशिकच्या भाविकांनी शुक्रवार दि १४ रोजी पहाटे पासूनच रामकुंडावर स्नान करण्यासाठी एकच गर्दी केली होती मकर संक्रांतीला महिला या एक दुसऱ्याला वान देण्याची प्रथा असल्याने या ठिकाणी महिला वाणांचे आदानप्रदान करतांना दिसत होत्या . त्यामुळे महिलांची संख्या लक्षणीय होती या वानामध्ये मातीचे बोळके हिरवे हरबरे , गाजर , गव्हाच्या ओंब्या , बोर , उसाचा तुकडा तिळाचे लाडू हे असते त्यासाठीच्या वस्तू विक्री करण्यासाठी रामकुंड येथे विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली . तसेच दीप दान करणाऱ्या महिलांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात दिसुन आली त्यामुळे सध्या शांत असलेला हा गंगाघाट परिसर भक्तीच्या रसात चिंब झाला होता . गोदाघाटाच्या परिसरात स्मार्टसिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबवित असल्यामुळे येथे दगडी फरशा दीपमाळा ड्रेनेजलाइन आदींच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे . अशा परिस्थितीत येथे झालेली गर्दी आणखी अडचणीत भर टाकणारी ठरत होती . मकरसंक्रांतीच्या पूजेचे साहित्याची विक्री करणारे विक्रेते , वाण घेण्यासाठी बसलेले भिकारी आणि विविध प्रकारचे दान करणाऱ्यासमोर गर्दी करणारे भिकारी यांचीही या गर्दी आणखी भर पडत होती . या गर्दीत मास्कचा वापर करण्याची काळजी कुणीच घेत नसल्याचे दिसून आले इंद्रकुंड कडून रामकुंडाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर पंचवटी पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते . मात्र याठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने नागरिकांसह वाहनांची ये जा सुरू होती . यामुळे कपालेश्वर मंदिर समोर व रामकुंड परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहन पार्किंगमुळे अधिकच समस्या निर्माण होत होत्या . स्थानिक तसेच परप्रांतीय महिला भाविकांनी सकाळपासून रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केली होती . बहुतांश भाविक स्नान करून झाल्यावर कपालेश्वर महादेव मंदिर , काळाराम मंदिर , सीतागुंफा आदी मंदिरात दर्शनासाठी जात असल्याने याठिकाणीही भाविकांची रिघ लागली होती . यासह तपोवनातील कपिला संगमावरही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली होती
कोरोना नियम धाब्यावर मकरसंक्रांतीला गोदाघाट परिसरात भाविकांचा उत्साह आणि गर्दी,. नाशिक शांताराम दुनबळे.
byMahendra Rajput
-
0