पुणे : इंदापूर तालुक्यातील काझड येथे आई - वडील जमीन वाटून देत नसल्याने व पैसे देत नसल्याच्या कारणावरुन नराधम मुलाने आईवरती लोखंडी कोयत्याने वार करुन ठार मारल्याची व वडीलांवरती कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची हृदयद्रावक घटना इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये घडली आहे.
याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी मुलगा अमित पांडुरंग नरूटे (वय - ३१, रा. काझड, सिधोबाची वस्ती) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमध्ये अलका पांडुरंग नरुटे ( वय -55 रा. काझड) या महिलेच्या डोक्यात तसेच अंगावर लोखंडी कोयत्याने सपासपा वार करुन खून करण्यात आला असून याप्रकरणी जखमी पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६०) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पांडुरंग नरुटे यांची काझड परीसरामध्ये शेती व घर आहे. रविवार (ता.२) रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास काझड जवळील सिधोबाची वस्ती येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अमित याने आईला शेतामध्ये पंप सुरु करण्यासाठी जायाचे असल्याचे सांगून शेतामध्ये घेवून गेला. व उसाच्या शेतामध्ये कोयत्याने आईच्या डाेक्यामध्ये तसेच शरीरावरती वार करुन निघृण खून केला.
आईला जीव मारल्यानंतर वडिल पांडुरंग यांना जीव मारण्यासाठी अमित घरी आला होता. यावेळी वडिल फोन वरती मुलाची विचारपूस करीत होते. वडिलांनाही शेतातील पाईप फुटला असून पाईप जोडण्यासाठी आपण दोघे जावू असे म्हणत होता. मात्र वडिलांना संशय आल्याने त्यांनी घराच्या बाहेर जाण्यास नकार दिला. यावेळी वडिल फोनवरती बोलत असल्याने अमित ने वडिलांच्या डाव्या हाताच्या दंडावर व हातावरती वार केला. यामध्ये त्यांची दोन्ही हाताची बोटे तुटली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये फोन सुरु असल्याने शेजारच्या नागरिकांना प्रकार कळताच त्यांनी तातडीने पांडुरंग नरुटे यांचे घर गाठले व त्यांची मदत केली.
सदर प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सा. पो. निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.
Tags
news
