पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यभरात टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात मोठ्य़ा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी माजी आयुक्त तुकाराम सुपे, सुखदेव डेरे अशा अनेक बड्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक केली आहे. आता मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला या प्रकरणात ठाणे शहरातून अटक करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता पुण्यात कोर्टात या अधिकाऱ्याला आणले जाणार आहे. ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करीत असताना म्हाडा व टीईटीच्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले होते.
Tags
news
