इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी नावे ' ती ' जागा ट्रस्टकडे - हर्षवर्धन पाटील - जागेवर पब्लिक ट्रस्टचाच ताबा प्रतिनिधी दत्ता पारेकर




    पुणे:इंदापूर तालुक्यातील जनतेच्या सार्वजनिक कामासाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी नावे ' ती ' जागा घेतली होती. या जागेशी अखिल भारतीय काँग्रेस (आय ) कमिटीचा संबंध येत नाही. या जागेचा मालमत्ता कर, पाणी पट्टी, विज बिल आदी वर्षानुवर्षे आम्ही भरत आहोत, हे सगळ्यांना माहिती आहे. आज ही जागा पब्लिक ट्रस्टच्या ताब्यात आहे व राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले.
          सदरची जागा आमची असल्याचा दावा करीत जिल्हा व तालुका काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुपारी या जागेचे कुलूप काढून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत पोलीस स्टेशन मध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. तसेच पोलिसांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चेस येण्याची विनंती केली. त्यानुसार हर्षवर्धन पाटील व संबंधितांची पोलीस स्टेशनमध्ये चर्चा झाली.
         यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चुकीचा व अयोग्य आहे. इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीने  ही जागा पब्लिक ट्रस्ट केली आहे. इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी व अखिल भारतीय काँग्रेस ( आय ) कमिटी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आज पब्लिक ट्रस्टच्या ताब्यात ही जागा असून सार्वजनिक मालमत्ता झाली आहे, कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. या जागेसंदर्भात वाद असण्याचे कारण नाही. या जागेच्या ताब्या विषयी संबंधितांशी चर्चा झाली, आम्ही कागदपत्रेही दाखविली. यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालु आहे, संबंधितांनीही हे मान्य केले. सदरची जागा आज पब्लिक ट्रस्ट कडे आहे व आगामी काळातही राहील, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, दुपारनंतर पब्लिक ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांनी काढलेले कुलूप पुन्हा लावून जागा पूर्ववत ताब्यात घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने