शिरपुर - तालुक्यातील दहिवद शिवारातील शेतात अचानक आग लागल्याने २० हेक्टर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रव्याची नोंद करण्यात आली आहे. दहिवद शिवारातील मिनाबाई पाटील यांच्या ऊसाच्या शेतात दि. २१ रोजी दुपारी १२. ३३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाबबाजुच्या शेतात काम करीत असलेल्या संजय बळीराम माळी ( ५१ ) रा. अजंदे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांना आगची माहिती दिली. परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले असल्याने आग आटोक्यात आली नाही. या आगीत चार शेतकऱ्यांचे २० हेक्टर ऊसाचे पीक जळुन खाक झाला आहे. त्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी संजय माळी यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ उदय पवार करीत आहेत.
Tags
news
