जय मल्हार'च्या जयघोषात, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि चंपाषष्ठीच्या योगात शिरपूरच्या श्री. खंडेराव मंदिरात उत्साहात साजरी चंपाषष्ठी!




                         मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी चंपाषष्टी हा धार्मिक उत्सव धुळे जिल्ह्यातील जागृत व प्रसिध्द श्री. खंडेराव महाराज मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शिरपुर शहरातील अरुणावती नदी काठावरचे सुमारे 260 वर्षापूर्वीचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या द्वारे बांधलेले श्री. खंडेराव बाबा मंंदिरात 26 नोव्हेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात झाली.  गुरुवारी चंपाषष्टी किंवा स्कंदषष्टी म्हणून साजरी करण्यात आली. हा उत्सव म्हणजे खंडोबा किंवा खंडेराव हे दैवत भगवान शंकराचा अवतार मानले जातात.श्री.खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. हा सण कर्नाटक व महाराष्ट्रासारख्या राज्यांचा मुख्य सण आहे. आणि चंपा षष्ठीच्या त्या उपवासाने जीवनात आनंद मिळतो.  उपवास केल्याने मागील जन्मातील सर्व पापे धुऊन जातात व पुढील जन्म आनंदी होतो, या मान्यतेच्या आधारे खंडोबाला आपले आराध्य दैवत मानून पूजा करणाऱ्या भाविकांनी ९ डिसेंबर रोजी चंपाषष्टी उत्सव थाटामाटात साजरा केला. विधिवत पूजाअर्चना द्वारे संध्या.7 वाजता पुजारी मोरे बंधु आणि श्री. खंडेराव बाबा संस्थान चे विश्वस्त तसेच भाविकांच्या  उपस्थितित पूजा ,महाआरती करून बाजरीची भाकर व खमंग वांगे भरीताचा नेवैद्य देवाला दाखवून महाप्रसाद वाटपास सुरूवात झाली. रात्री 10:00 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने श्री. खंडेराव भक्तगणांनी याचा 'जय मल्हार' च्या जयघोषात लाभ घेतला.यांत महिला-पुरुषांसह सर्व आबालवृद्ध भक्त सामिल होते.पारंपरिक पुजारी मोरे परिवारातील गोविंदाअप्पा , भानुदास मोरे व त्यांचे तरुण सहका-यांनी दानदात्यांसह विश्वस्तांच्या सहकार्याने देवदर्शनासह महाप्रसाद वाटपाचे चोख नियोजन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. खंडेराव मंदिर संस्थान चे प्रमुख विश्वस्त सर्वश्री कैलास धाकड, संजय आसापुरे, गुलाब भोई, किरण दलाल,साहेबराव महाजन, गोपाल के.मारवाडी,संजय पाटील,गोपाल ठाकरे, जगदीश बारी,गजानन मगरे इ.ट्रस्टींसह पुजारी मोरे बंधु व पाताळेश्वर मंदिराचे पुजारी शेखर महाराज इ. नी सहकार्य केले.मंदिरावर भव्य रोषणाई करण्यात आली. दररोज रात्री भजनी मंडळाने भजन कीर्तनाने रंग भरला होता. नारळ , फुलहार, पूजासाहित्य विक्रेत्यांनी ही आपली दुकाने थाटली होती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने