शिरपूर: बाजारपेठेत ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हक्क जाणून घ्यावेत. ग्राहक संरक्षण कायद्यातील बदल समजावून घ्यावेत, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष एस. पी. बोरवाल यांनी केले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, धुळे, तहसील कार्यालय, शिरपूर, जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सकाळी शिरपूर येथील एस. एम. पटेल मेमोरियल हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार आबा महाजन, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी, आशाताई रंधे, ग्राहक पंचायतीचे राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते.
श्री. बोरवाल म्हणाले, ग्राहकांच्या हक्कांसाठी आजच्याच दिवशी 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. यानिमित्त दरवर्षी आजचा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या कायद्यात सन 2019 मध्ये बदल करण्यात आले. या बदलांमुळे ऑनलाइन मार्केटिंगवरील ग्राहकांचा समावेश करण्यात आला. आता ग्राहक मचंचे जिल्हा ग्राहक आयोगात रुपांतर झाले आहे. या आयोगात अध्यक्षांसह दोन सदस्यांचा समावेश असतो. या आयोगाकडे आपण जिथे राहतो, तिथूनही दाद मागता येते. जिल्हा आयोगाकडे एक कोटी रुपयांपर्यंतच्या दाव्याची दाद मागू शकतात. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आयोग आहेत. या आयोगांकडे ग्राहकांना दाद मागता येते, असेही त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, ऑनलाइन मार्केटिंगमुळे ग्राहक हा 24 तास ग्राहक झाला आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचा सर्वांना लाभ झाला आहे. या शिवाय विविध सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची जबाबदारी वाढली आहे. व्यापारी सुद्धा या समाजाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहक व व्यापारी यांच्यामध्ये एकमेकांना पूरक आणि सौहार्दाचे वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कोविड19च्या काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. मिसाळ यांनी सांगितले, यंदाच्या ग्राहक दिनाची संकल्पना Consumer-Know Your Rights अशी आहे, प्रत्येक नागरिकाने ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती करून घ्यावी. या कायद्याचा परिणामकारक वापर करावा. सजग राहून आणि खात्रीशीर ठिकाणी गुंतवणूक करावी. श्री. भंडारी, राकेश मोरे यांनी मार्गदर्शन केले. सुमित बारी, जानव्ही पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. तहसीलदार श्री. महाजन यांनी आभार मानले.
ग्राहक दिनास दिल्या शुभेच्छा
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
Tags
news