महाराष्ट्र राज्यात प्रवेशासाठी दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती




धुळे, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत किंवा त्यांच्याकडे 72 तास पूर्ण न झालेला आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीचा अहवाल असणे अनिवार्य आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.



साथरोग आजार कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य शासनाने राज्यात ‘कोविड- 19’ चा साथरोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना व खबरदारीचे निर्देश दिले आहेत. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ‘ओमयक्रॉन’चे नवीन रुग्ण राज्यात वाढीस लागण्याची शक्यता असल्याने विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे, ज्या लोकांचे लशीचे दोन्ही डोस झालेले आहेत त्यांनाच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करता येईल. राज्य शासन व केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना व कोरोना विषाणूच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास टॅक्सी, खासगी वाहने, खासगी प्रवासी बस अथवा बसमधील व्यक्तींना पाचशे रुपये दंड असेल. प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान किमान सहा फुटांचे सामायिक अंतर ठेवावे. ड्रायव्हर, हेल्पर, कंडक्टर यांना सुध्दा पाचशे रुपये दंड असेल. 
ट्रान्सपोर्ट एजन्सीचे खासगी प्रवासी बसच्या मालकांना दहा हजार रुपये दंड असेल. वरील प्रकारचे उल्लंघन वारंवार होत असेल, तर त्यांची अनुज्ञप्तीची मान्यता रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे अथवा जोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असेल तोपर्यंत अनुज्ञप्ती निलंबित करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी वाहन मालक, चालकांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने