शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या 165 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न...



शहरासाठी 90 कोटी रुपयांचे 688 घरकुले, 57 कोटीचे रस्ते कॉंक्रीटीकरण, 1.40 कोटीच्या पाण्याची टाकी, 15 कोटी खर्चाच्या हॉस्पिटलच्या वाढीव इमारतीचे भूमिपूजन

शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या 165 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असून शिरपूरकर जनतेसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पटेल परिवाराची परंपरा अखंडितपणे सुरूच आहे.



शिरपूर शहरासाठी 90 कोटी रुपयांचे 688 घरकुले, 57.42 कोटीचे रस्ते कॉंक्रीटीकरण, 1.40 कोटी रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची टाकी, 15 कोटी खर्चाच्या हॉस्पिटलचे वाढीव इमारतीचे काम असे एकूण 165 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विविध विकासकामांचे काम सुरु करण्यात आले आहे. याचवेळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



शिरपूरच्या जनतेला यापूर्वी मिळत होत्या त्यापेक्षा देखील जास्त प्रमाणात यापुढे अनेक सोयीसुविधा मिळणार असल्याने शिरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे मनापासून आभार मानले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घटक क्र.- ३ ए. एच. पी. प्रकल्प “केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समिती”च्या बैठकीत दि. २५/०३/२०२१ रोजी घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून योजनेच्या या कामांना त्वरित मंजुरी प्राप्त झाली आहे.

सदर प्रकल्प हा शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या मालकीचे मुकेशभाई रिक्रिएशन गार्डनच्या मागे, भूखंड स.नं. ६०  या जागांवर प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक साठी ४०० घरकुले व मध्यम उत्पन्न गट घटका साठी २८८ घरे असा एकूण ६८८ घरकुलांचा यात समावेश आहे. सदर प्रकल्पाची एकूण किंमत (रस्ते,गटार, पाणी पुरवठा इ. सह) रुपये ९०.०२ कोटी एवढी आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व मध्यम उत्पन्न गट घटकसाठी पात्र लाभार्थींना प्रत्येकी २.५० लाख मात्र अनुदान मिळणार आहे.

तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषदेने शिरपूर शहरात उर्वरित काँक्रीट रस्ते तयार करण्यासाठी 60 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सादर केला होता. या कामास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी 17/12/2020 रोजी 59.02 कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने या योजनेतून 57.42 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी 27/10/2021 रोजी दिली.


शासनाकडून यापैकी 16.39 कोटी रुपये प्राप्त झाले असून नगरपरिषदेचा हिस्सा 8.61 रुपये असे एकूण 25 कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी नगरपरिषदेला मिळालेले आहेत. या योजनेअंतर्गत शिरपूर शहरात उर्वरित ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शिरपूर वरवाडे नगर परिषदेने शिरपूर परिसरातील लोकांचे आरोग्यमान चांगले राहावे त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून 100 बेडचे इंदिरा गांधी हॉस्पिटल सुरू केले आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच कोरोना काळात व अनेकदा रोगराई मध्ये सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल नगराध्यक्ष, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी इंदिरा गांधी हॉस्पिटल चे इमारतीला लागून वाढीव इमारतीचे बांधकाम करण्याचे ठरविले. त्यासाठी 1 कोटी रुपये भरून भूसंपादन केले. या हॉस्पिटलसाठी सहा मजली इमारतीचे सर्व सोयींनीयुक्त सुविधा, अत्याधुनिक लॅब सह बांधकाम चे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे 50 हजार चौ. फूट बांधकाम करण्यात येणार असून यासाठी नगरपरिषदेला सुमारे 15 कोटी रुपये खर्च येणार आहे.

शिरपूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने नव्याने जलकुंभ निर्मितीला येत आहे. शहरातील वार्ड क्रमांक 14 म्हणजेच यापुढील वार्ड क्रमांक 13 व 15 साठी शहरातील चोपडा जीन परिसरात पुढील तीस वर्षानंतरचा विचार करता नवीन जलकुंभाचे देखील भूमिपूजन आज करण्यात आले. 1.50 कोटी रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी भविष्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे


माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपूजन
कार्यक्रम आ. काशिराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी तुषार नेरकर, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने