भव्य काशी-दिव्य काशी' महोत्सवात घुमणार महाराष्ट्रचा धनगरी ढोल आरेवाडीकरांना सांस्कृतिक महोत्सवाचे आमंत्रण प्रतिनिधी दत्ता पारेकर

'



पुणे :- उत्तर प्रदेशातील वाराणशी येथे गंगा नदीच्या तीरावर असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारात पार पडत असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात आरेवाडी (जि. सांगली) कैपत नृत्य सादर करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सुरू असलेल्या 'भव्य काशी-दिव्य काशी' महोत्सवात महाराष्ट्राचा धनगरी ढोल वाजणार आहे.

       अवघ्या ३२ महिन्यात १३ एकर परिसराचे सुशोभीकरण करून साकारलेल्या भव्य दिव्य अशा काशी विश्वेश्वर धामचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वाराणशी येथील गंगातीरावरील काशी विश्वेश्वर हे एक ऐतिहासिक तीर्थस्थान आहे. मुघल काळात या मंदिराच्या झालेल्या मोडतोडीनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केला होता. त्यानंतर या मंदिर परिसराचा मोठा कायापालट करत विविध सुविधांयुक्त ऐतिहासिक पर्यटन/धार्मिक/सांस्कृतिक केंद्र साकारले गेले आहे.

       याच काशी तीर्थक्षेत्राचा आणि बिरुदेवाचा ऐतिहासिक संबंध असल्याचे मौखिक साहित्यामध्ये (पारंपारिक धनगरी ओव्या) ऐकायला मिळते. काशीलींग बिरुदेव या नावातच काशीचा उल्लेख येतो, त्यामुळे काहीतरी संदर्भ असल्याचे स्पष्ट होते. याच काशीलींग बिरुदेवाच्या भक्ती आणि सेवा प्रीत्यर्थ जपले गेलेले आरेवाडी येथील कैपत नृत्य काशीमध्ये सादर करण्याची संधी मिळत आहे. आरेवाडीच्या बनातील बिरोबाच्या कांबळ्याचे निशाण काशी विश्वनाथाच्या गंगातिरी फडकावून ढोल कैताळाचा गजर करण्याचा, हा क्षण धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अविस्मरणीय ठरणारा आहे. 

       असा हा ऐतिहासिक असणारा सांस्कृतिक महोत्सव दि. २२ ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यान पार पडणार असून लवकरच आरेवाडी येथील १५ कलाकारांचे पथक वाराणशीला रवाना होणार आहे. सांस्कृतिक/धार्मिक वसा व वारसा लाभलेली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली ढंगदार लोककला सादर करून भव्यदिव्य सोहळ्याचे साक्षीदार बनणार आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने