निसर्ग व पर्यावरण मंडळाची दिशा ठरविण्यासाठी अण्णा हजारे यांची भेट ६७ वृक्षांचे रोपण करून ‘वृक्षमित्र’ मोरे यांना श्रद्धांजली ; जळगाव जिल्हा प्रतिनिधींचा सहभाग






भुसावळ : भुतान देशासह विविध ठिकाणी पर्यावरण संमलेन भरवून त्या त्या ठिकाणाचे पर्यावरणाचे प्रश्न राज्यभरातील पर्यावरण अभ्यासक आणि निसर्गप्रेमींच्या लक्षात आणून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, महाराष्ट्रातील कृतीशील शिक्षक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची मुहूर्तमेढ रोवणारे वृक्षमित्र आबासाहेब मोरे (वय ६७) यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या जळगाव जिल्ह्यासह राज्य प्रतिनिधींनी दशक्रिया दिनी मोरे यांच्या मूळगावी (सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) जाऊन येथील स्मशानभूमीत मोरे यांच्या वयाइतक्या ६७ वृक्षांचे रोपण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी निसर्ग व पर्यावरण मंडळाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेण्यात आली.

वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी सन १९८२ सालापासून अण्णा हजारे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले समाजकार्य सुरु केले होते. शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या मोरे यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर राज्यातील पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची उभारणी केली होती. या मंडळाची यापूर्वी चार संमेलने संपन्न झाली. यात ‘भूतान’च्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याचा समावेश होता. कोरोना संक्रमण काळातील नियमावली शिथिल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमलेन घेण्याचा त्यांचा मानस होता. त्याची तयारी सुरु असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याने मंडळाशी निगडीत राज्यभरातील पर्यावरणप्रेमींना मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दशक्रिया विधीला राज्यभरातील प्रतिनिधींनी सुरेगाव येथे एकत्र येऊन मोरे यांच्या त्यांच्या वयाइतक्या आणि सुमारे १० फुट उंचीच्या बहावा, तिकोमा, सप्तपर्णी, वड, लिंब, करंज, आंबा, पिंपळ आदी ६७ झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड कार्यात श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने मोलाचे योगदान दिले. या झाडांच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी सुरेगाव ग्रामपंचायतीने स्वीकारली आहे. यावेळी ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी आपली प्रवचन सेवा दिली.

दशक्रिया विधीनंतर पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांशी बोलून २५ व २६ डिसेंबर २०२१ ला राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलन निश्चित करण्यात आले. यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी, ‘हातून चांगलं कार्य घडायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. आबासाहेब मोरे यांनी याच वेडाने प्रेरित होऊन पर्यावरणाचे काम केले’ असे म्हटले. आबासाहेब मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणं, त्यांचा वारसा चालविणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. आयुष्यात स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात. जी माणस जीवनात नैराश्य न येऊ देता आपला गाव आणि समाजाचा विचार आणि कृती करून जातात ती खऱ्या अर्थाने सदैव जीवंत राहातात. आबासाहेबांप्रमाणे कौटुंबिक प्रपंचात राहून हळूहळू तो प्रपंच सामाजिक स्तरावर मोठा करण्याचा सल्ला अण्णांनी कार्यकर्त्यांना दिला. पर्यावरणाचा प्रश्न वैश्विक आहे. तापमान आणि प्रदूषण वाढतेय. नवनवीन आजार येताहेत असेही अण्णा हजारे म्हणाले. पर्यावरण सखी मंच चे राज्य समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष जळगाव मी सर्व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ चे नाना पाटील सर यांनीही आदरणीय  स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी ज्याप्रमाणे अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले तेच काम आपण आता अण्णांच्या मार्गदर्शनाखाली छत्र छायेखाली सुरूच ठेवू या असे यावेळी ते म्हणाले त्यावेळीत्यांनी रानमळा पॅटर्न चे प्रणेते आदरणीय पी टी शिंदे यांचाही परिचयआदरणीय अण्णासाहेब हजारे यांना करून दिला त्यानंतर निसर्ग पर्यावर  मंडळाचे राज्य सचिव आणि कोकण प्रतिनिधी धीरज वाटेकर श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, वृक्षमित्र आबांनी वयाच्या १० वर्षी आईच्या सोबतीने पहिलं झाड लावलं होतं. १९८२ साली अण्णा हजारे नावाच्या परिसाचा स्पर्श झाल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सक्रीय काम करणारी व्यक्ती गेल्याने बसलेल्या धक्क्यातून सावरत माणसातील चांगुलपणाचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबांनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली लावलेलं आणि महाराष्ट्रभर पसरलेलं पर्यावरणाचं रोपं आपल्याला अधिकाधिक ठिकाणी पसरवायचं आहे, असे वाटेकर म्हणाले.
मोरे यांना १९९१ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘वनश्री’, १९९२ मध्ये भारत सरकारने ‘वृक्षमित्र’ तर २०१३ साली राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत त्यांनी ३२ वर्षे सेवा बजावली होती. अगदी अलिकडेच ‘राज्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी ‘पद्म’ पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. यावेळी मंडळाचे कोकण प्रतिनिधी आणि वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक आणि राज्य सचिव धीरज वाटेकर यांच्यासह कार्याध्यक्ष प्रमोद काकडे, अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, ‘वनश्री’ महेंद्र घागरे, राज्य सल्लागार सदस्य ‘वनश्री’ बाळासाहेब जठार, राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारी, कार्यक्रम नियोजन राज्य सचिव सुभाष वाखारे, पुणे जिल्हाध्यक्ष मारुती कदम, जळगाव जिल्हाध्यक्ष नाना पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधाकर शेटे, राजाराम ढवळे, बाळासाहेब भोर,सुरेंद्रसिंग पाटील पाटील भुसावळ छायाचित्रकार सतिश दलंगे. तसेच भुसावळचे ज्येष्ठ नागरिक पर्यावरण प्रेमी राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे यांनीही दुःख व्यक्त केले आणि देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘रानमळा’ पॅटर्नचे प्रणेते पोपट तुकाराम शिंदे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने