पुणे: इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेमुळे अशांतता निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यामुळे शनिवार (दि.27) पासून इंदापूर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सकाळी 10 वाजले पासून शेतीचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करणेसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात येईल, असा अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी ( दि. 26) दिली .
शेती पंपांचा गेली आठ-दहा दिवसांपासून बंद करण्यात आलेला वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी बावडा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकरी ठिय्या आंदोलन करीत आहेत. आज शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या आंदोलनास हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दुपारी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महावितरणच्या मनमानीपणामुळे सध्या शेती कधी नव्हे एवढी संकटात सापडली आहे. जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांच्या रोषाची तात्काळ दाखल घ्यावी व वीजपुरवठा पूर्ववत चालू करावा, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
महावितरणने शेतकऱ्यांना दिलेली बिले अतिशय जास्त आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून दिलेली आहेत. त्यामुळे सध्या महावितरणने तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा, चुकीची दिलेली बिले दुरुस्त करावीत व बिल दुरुस्तीसाठी कक्ष उघडावेत. शासनाने वीज बिलामध्ये मोठी सवलत द्यावी व सवलत देय रक्कम भरण्यासाठी टप्पे पाडून दिल्यास शेतकरी बिल भरण्यात सहकार्य करतील, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. मात्र यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी वरून आदेश असल्याने असमर्थता व्यक्त केली. महावितरणच्या इथल्या अधिकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती आपल्या वरिष्ठांना समजावून सांगून शेतीचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. याप्रसंगी आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते तसेच महावितरणचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपस्थित होते.
Tags
news
