धन तेरस ला मित्रत्वाचे अनमोल धन हरपले,
चंदनआबा आपण आम्हास पोरके केले
दीपावलीच्या शुभ पर्वात धनतेरस च्या दिवशी आमचे मित्रत्वाचे अनमोल धन काळाच्या ओघाने हरपले आणि आमच्या सर्व मित्रांचा जीव की प्राण ,आमचा आदर्श, आमचे दैवत व चंदन आबांचा मित्रत्वाच्या रुपात असलेली आमच्या आयुष्यातली खरी कमाई धनतेरस च्या दिवशी आमच्यापासून हिरावून गेली . काल स्वर्गीय चंदनसिंग राजपूत यांनी अल्पशा आजारानंतर जगाच्या अखेरचा निरोप घेतला. काल आमच्या कोणत्याच मित्राच्या घरी धन पूजा झाले नाही आमच्या आयुष्यातल्या खरे धन आम्ही गमावले, त्यापेक्षा मोठे धन आमच्यासाठी कोणतेच नाही ज्याची आणि पूजा करावी .
चंदन आबा हे फक्त नाव नाही तर एक वादळ होते, शेकडो तरुणांच्या रूदयात बसलेले व आपल्या स्वकर्तुत्वाने अनेक मित्रांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून प्रत्येकाचे जीवन घडवण्यात, सुखात दुःखात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चंदन आबा विषयीचे लिहायचे झाले तर त्यांच्या कर्तुत्व व महानता याविषयी लिहिण्यासाठी आमची लेखणी नेहमीच आतुर असायची मात्र आज हे माझे दुर्भाग्य आहे आज त्यांच्या कौतुक करण्याऐवजी त्यांचे विस्मरण करत त्यांना श्रद्धांजलीपर लेख आज लिहावा लागत आहे यापेक्षा मोठे दुर्दैवं नाही. आबांना श्रद्धांजली देण्याची वेळ आमच्यावर येईल असा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता. पण का कुणास ठाऊक आमचे सुख नियतीला सहन झाले नाही आणि नियतीने आमच्यातून आमच्या अनमोल हिरा हिरावला. चंदन आबा आमच्यासाठी फक्त मित्रच नाही सर्वस्व होता, आबांचा शब्द आमच्यासाठी आदेश असायचं आणि तो आदेश मोडणे ची ताकत आमच्यात कधीच निर्माण झाली नाही .आम्ही सदैव त्यांना एक दैवत म्हणून मानले.
एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन एम. एस. सी. चे शिक्षण पूर्ण करून आयुष्यात कोणाची चाकरी करायची नाही ,कोणाची गुलामगिरी करायचं नाही आणि कोणाच्या बापाला घाबराचे नाही म्हणून त्यांनी नोकरी व चाकरी कधीच स्वीकारली नाही .शैक्षणिक, वैचारिक, राजकीय कोणतीच गुलामगिरी त्यांना कधीच मान्य नव्हते .म्हणून त्यांनी जीवनात संघर्ष करत स्वतःच्या व्यवसाय उभा केला आपल्या कलागुणांना कौशल्याने नेतृत्वाच्या बळावर हजारो युवकांना प्रेरणा देऊन त्यांना संघटित केले आणि आपली स्वतःची एक आर्मी तयार केली. आणि त्या जोरावर समाज सेवेची सुरुवात करून राजकारणात प्रवेश केला. शिरपूर तालुक्यात राजकारण करायचे असेल सर्वात अधिक धनशक्ती ची जोड लागते मात्र आबांनी रस्त्यावर आपले कार्यालय टाकले आणि जनसेवेला सुरुवात केली आणि ज्या धनशक्ती पुढे तालुक्यात आजवर कोणीही विजय प्राप्त करू शकला नाही अशा शक्तीला दोन वेळा जन शक्ती च्या जोरावर पराभव करून नगरसेवक पद मिळवले, ते पण फक्त मिळवलेच नाही तर भूषवले देखील. आपल्या नगर सेवक पदाला त्यांनी परिपूर्ण न्याय दिला व निर्णय त्यांना जनतेला अन्यायकारक आहेत त्यास सतत विरोध केला.आबांच्या कार्यालयात येणारे आमदार, खासदार व मंत्री
यांना ते अभिमानाने सांगायचे की हेच माझे कार्यालय आहे आणि तुम्हाला येथेच बसावे लागेल. सकाळ झाली कि जनसेवेसाठी रस्त्यावर आबांचा दरबार भरायचा आणि रात्री रस्त्यावर तो संपायचा. त्यांना कधीही कार्यालयाची ऑफिस ची खुर्ची आणि ए.सी. ची गरज भासली नाही. आणि म्हणून आबांची नाड गरिबातल्या गरीब माणसाशी जोडली गेली. सर्व समाज समावेशक अशा लोकांशी ते मनाने जोडले गेले होते .आपल्या हातून कधीही कोणावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आपल्यापासून कोणी दूर होणार नाही याची देखील काळजी त्यांना असे. समस्या कितीही लहान आणि कितीही मोठी असो एकदा ते आबा पर्यंत पोहोचले तर त्या समस्येचे निदान झाले असे समजायचे इतका आत्मविश्वास सर्वांना होता .मात्र जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला आणि म्हणून कदाचित सर्वांना पोरके करून देवाने आबांना आपल्यातून बोलावून घेतले. आबांची इच्छाशक्ती प्रचंड होती. ईश्वराच्या बाबतीत देखील आबा ना पूर्ण श्रद्धा होती. आबांची बजरंग बली वर अपार श्रद्धा होती म्हणून त्यांनी बजरंगबली चरणीच आपले कार्यालय उभारले होते. तारूण्य पासून आज पर्यंत व्यायाम कसरत करून कमावलेले धस्ट पुष्ट शरीर ,मनमोहक शरीरयष्टी आणि त्यापेक्षा विशाल असलेले मन या त्यांना मिळालेल्या दैवी देणं होत्या. मी आणि आबा एकाच समाजात जन्माला आलो पण मला जर कोणी हा प्रश्न विचारला की तुझे आणि आबांचे नाते काय? या प्रश्नाचे उत्तर मला कधीच देता आले नाही. आबा आणि माझे संबंध हे जात, समाज, नाते व मैत्री या पलीकडचे होते .मागील 25 वर्ष पासून आबांशी ऋणानुबंध जोडले होते.
मागील दीड वर्षापूर्वी आबांना एका दुर्धर आजाराने ग्रासले तरीदेखील खचून न जाता त्यांनी त्या आजारावर यशस्वीपणे मात केले आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वात येऊन जनजीवन सुरू केले .आबांना मिळालेला जीवनदान मुळे सर्व मित्रांना पुन्हा एकदा आबांच्या रुपाने जीवनाची नवसंजीवनी मिळाली. मात्र या आजाराने आतून आबांना पोखरले आबांची झुंज मित्रांच्या प्रार्थना, कुटुंबियांचे सांत्वन कुठेतरी अपूर्ण पडले, आणि काल जगाचा अखेचा निरोप घेतला. आबांच्या जाण्याने फक्त परिवार नाही मित्रपरिवार व समस्त राजपूत समाजाची फार मोठी हानी झाली असून त्याची भरपाई होणे किमान या जन्मात शक्य नाही . आबा ला दुसरा पर्याय असूच शकत नाही. आबांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा जन्माला यायला किमान 2 पिढ्यांना वाट पहावी लागेल. त्यामुळे विरोधकांना देखील हवाहवासा वाटणारा असा हा युवा नेता ज्याने निस्वार्थपणे जनसेवा केली,कधीही कोणत्या आमिषाला बळी न पडता स्वाभिमानी जीवन जगला अशा आमच्या आमच्या मित्राला सर्व मित्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आबांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यास परमेश्वर आम्हास बळ देवो आणि आबांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.





