शिरपूर : भूपेशभाई फ्रेंड सर्कल व शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नाने तालुक्यातील 23 गावे व अनेक पाड्यांमध्ये मंगळवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून सर्वांनी या विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी केले आहे.
शिरपूर तालुक्यात भूपेशभाई फ्रेंड सर्कल च्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून विशेष लसीकरण मोहीम शिरपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. शासन स्तरावरून देखील कवच-कुंडल मिशन व हर घर दस्तक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
टेंभेपाडा, गदडदेव, फत्तेपूर, रोषमाळ धनवाडी, साकळीपाडा, कंज्यापाणी, सामरादेवी, रामपुरा, वडपुरा, धरमपुरा, विघन्यापाडा, ठाणसिंगपाडा, मालापूर, खामखेडा, आंबे, चिलारे, महादेव, हिगाव, पिरपाणी, टिटवापाणी, आसरापाणी, उमर्दा, मोहिदा, बुडकीविहिर, हेंद्रेपाडा, बाटवा, गुऱ्हाळ, कढईपाणी, प्रधानदेवी, थुवानपाणी, निशाणपाणी या अनेक ठिकाणी सोमवारी दि. 22 नोव्हेंबर रोजी या 23 गावांसह पाड्याना जनजागृती करण्यात येऊन मंगळवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी या सर्व गावांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
शिरपूर तालुका 100 टक्के लसीकरण युक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून कोविड-19 प्रतिबंधक दोन्ही लस घेतल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने शिरपूर तालुका सक्षम व्हावा या दृष्टीने आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मोहीम राबविण्याचे सुरू केले आहे.
यासाठी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील तसेच भूपेशभाई फ्रेंड सर्कल च्या वतीने लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
आमदार काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे गेल्या काही दिवसांपासून विशेष लसीकरण मोहिमेत तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी गावोगावी प्रत्यक्ष फिरून जनजागृती करत असून याबद्दल ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत.
यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती ची यंत्रणा, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण व आरोग्य तसेच विविध विभाग कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट, यांच्यासोबत भूपेशभाई फ्रेंड सर्कलचे असंख्य स्वयंसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
Tags
news
