धुळे, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक- 2021 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, या निवडणुकीची अधिसूचना 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक 23 नोव्हेंबर 2021 राहील. नामनिर्देशन पत्रांची 24 नोव्हेंबर 2021 रोजी छाननी होईल. 26 नोव्हेंबर 2021 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल, तर 14 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. 16 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले प्रतिनिधी मतदान करतील.
या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी श्री. शर्मा हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड (धुळे), सुधीर खांदे (नंदुरबार) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवार, सर्व मतदार, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले.
Tags
news




