खासगी कंत्राटी प्रवासी वाहतूक बसचे कमाल भाडेदर निश्चित प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही : जादाभाडे आकारल्यास कारवाई



 
धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी काळातील विविध सण, गर्दीचा हंगाम  लक्षात घेवून धुळे शहरातून खासगी बस वाहतुकीचे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्यास तक्रार करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. 
सध्या सण व गर्दीचा हंगाम सुरू होत असल्याने राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून खासगी कंत्राटी बसचा वापर होत आहे. या कालावधीत  खासगी वाहतुकदारांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशा खासगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मंबई येथे जनहित याचिका क्र. 149/2011 दाखल करण्यात आली होती. या याचिकेत मा. उच्च न्यायालयाने खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर  निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते. राज्यातील खासगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत. 


राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 25 ऑक्टोबर 2021 रोजीच्या ठरावानुसार एस.टी.महामंडळाच्या प्रवासी बसकरीता असलेल्या भाडेदरामध्ये 17.17 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. धुळे शहरातून खासगी बस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाव्दारे खासगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाशांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक खासगी बसकरीता भाडेदर निश्चित केले आहेत. कोणत्याही खासगी वाहतूकदार (खासगी ट्रॅव्हल्स ) कंपनीकडून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्याबाबत तक्रार  mh१8@mahatranscom.in व dycommr.enf२@gmail.com  या संकेतस्थळावर करावी. तसेच अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वाहतूकदारावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधित नागरिक व खासगी ट्रॅव्हल्स वाहतुकदारांनी नोंद घ्यावी.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने