विकेल ते पिकेल’ योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना सामावून घ्या! कृषी मंत्री दादाजी भुसे : कृषी महाविद्यालयात आढावा बैठक




धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसह नावीण्यपूर्ण योजनांमध्ये धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांच्या समावेश करून घ्यावा, अशा सूचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केल्या.
कृषी मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी कृषी महाविद्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, ‘आत्मा’चे उपसंचालक शांताराम मालपुरे यांच्यासह कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेत त्यांना विकल्या जाणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करावे. येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांचा वेळेवर पुरवठा होईल याचे नियोजन करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळवून द्यावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, अशाही सूचना कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केल्या. 


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जोशी यांनी सांगितले, गेल्या खरीप हंगामात तीन लाख 96 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला होता. यंदाच्या रब्बी हंगामासाठी 1 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बि- बियाणे, रासायनिक खतांचा शेतकऱ्यांना वेळेत पुरवठा होईल याचेही नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने