स्मशानभूमीचा रस्ता अपहार प्रकरणी अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे बिरसा फायटर्सची तक्रार



रत्नागिरी : कुडावळे  आदिवासीवाडीतील स्मशानभूमीच्या रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे अपहार प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी  गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
            निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभाग चिपळूण,उपविभाग दापोली यांच्या कडून 14 व्या वित्त आयोग सन 2018-19 अंतर्गत कुडावळे आदिवासी वाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्त्याचे खडीकरण करणे व  डांबरीकरण करणे या कामासाठी अंदाजित रक्कम 1,00,000/ रूपये खर्च दाखवण्यात आला आहे. मक्तेदार श्री. एम.डी.पोट  तालुका दापोली यांनी ही रक्कम खर्ची दाखवली आहे. हा रस्ता तयार केल्याची पाटी सुद्धा  गावात लावण्यात आलेली आहे. परंतु प्रत्यक्षात या रस्त्याचे कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही,अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.कारण हा रस्ता झाला नसून अजूनही जंगलातून जाणारी  पायवाटच आहे. 
             आदिवासी बांधव हे अनेक योजनापासून आजही वंचित आहेत.पाणी,वीज,रस्ता इत्यादी साठी शासनाकडून राबवल्या जाणा-या योजना ह्या फक्त कागदावरच राहतात. आदिवासी लोकांपर्यंत पोहचतच नाहीत,अशी अवस्था बघायला मिळत आहे .कुडावळे आदिवासी वाडीतील लोकांना स्मशानभूमीत प्रेत नेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग ही पायवाट आहे. हा मार्ग जंगलातून जातो.ही पायवाट 14 व्या वित्त योजनेंतर्गत खडीकरण व डांबरीकरण रस्ता  केल्याचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी दाखवला आहे. या बिकट  रस्त्याने प्रेत नेताना अनेकदा प्रेत पडून प्रेताची विटंबना झाली आहे. स्मशानभूमीच्या ठिकाणी शेड बांधण्यात आले आहे.तेही भितींला तडा पडून मोडकडीस आले आहे.प्रेत ठेवायला ओटा नाही,लोकांना बसण्यासाठी जागा नाही,प्रेत जाळतात ते स्टॅन्ड सुद्धा मोडले आहे. स्टॅन्ड हालवल्यावर खाली पडते. जवळच नदी आहे,परंतु त्या नदीत फक्त पावसाळ्यात पाणी असते.उन्हाळ्यात व हिवाळ्यात पाणी नसते.विजेची सोय नाही. अशी एकंदरीत बिकट अवस्था स्मशानभूमीची आहे. 
           या स्मशानभूमीत आवश्यक  सोयी सुविधा झाल्या पाहिजेत,चोरीला गेलेला आमचा स्मशानभूमीचा रस्ता शासनाने शोधून द्यावा अशी  मागणी श्रीम.चंद्रभागा पवार,शिवाजी पवार, संदेश जाधव, दिलीप पवार, किसन पवार ,वामन पवार, जानू वाघमारे, सुभाष जाधव व वाडीतील ग्रामस्थ करत आहेत.  स्मशानभूमीकडे जाणारा 2 किलोमीटर अंतराचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण केल्याचे दाखवण्यात आले आहे.त्याची पाटी गावात  लावण्यात आली आहे. परंतु रस्ता बनलाच नाही त्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी आदिवासी लोकांची फसवणूक केली आहे. पैशाचा अपहार करून भ्रष्टाचार केला आहे. अशा दोषी अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर  कडक कारवाई करावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे. निवेदन देतेवेळी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स,सूर्यकांत रावताळे युवा कार्यकर्ते,राम पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनासोबत रस्त्याचे फोटो व काम केल्याची खोटी पाटी फोटो जोडण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने