कोविड- 19 लसीकरणासाठी उद्या राबविणार जन अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी जलज शर्मा : नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन

 



धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोविड- 19 मोहिमेंतर्गत शनिवार 2 ऑक्टोबर 2021 रोजी जन अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील 65 हजार पात्र नागरिकांना कोविड – 19 ची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहिमेस सुरवात झाली. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 18 वर्षांवरील कोविड- 19 लसीकरण अपेक्षित लाभार्थ्यांच्या प्रमाणात पहिला डोस 47 टक्के, तर दुसरा डोस 41 टक्के लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. आता जिल्ह्यास मोठ्या प्रमाणात लस पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड- 19 लसीकरणापासून वंचीत नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण होण्यासाठी जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शनिवार 2 ऑक्टोबर 2021 रोजी 65 हजार नागरिकांचे लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नागरी आरोग्य केंद्रात किमान एक हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी लसीकरणाची माहिती देवून लाभार्थ्यांची यादी तयार करणार आहेत. प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत जन- अभियान कार्यक्रमाबाबत चर्चा करून जनसहभाग जनजागृती करण्यात येईल. जनअभियान कार्यक्रमात संबंधित क्षेत्रातील शिक्षक जनजागृती आणि नोंदणीसाठी सहकार्य करतील. तसेच लस घेतलेल्या नागरिकांचे प्रबोधन करून लसीकरणासाठी प्रवृत करतील.

या अभियानांतर्गत ग्रामसेवक जनजागृती करून लसीकरणासाठी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करून देतील. याशिवाय ग्रामपंचायतीचे संगणक परिचालकही लसीकरणाच्या ठिकाणी उपस्थित राहतील. लसीकरणासाठी आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम करावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक ते नियोजन करावे. प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या अधिनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कोविड- 19 लसीकरण झाल्याची खात्री करून घ्यावी. अद्याप लस घेतलेल्या अथवा दुसऱ्या डोससाठी कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिल्या आहेत.

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे

धुळे जिल्ह्यात 2 ऑक्टोबर 2021 रोजी 65 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणारसाठी पात्र ज्येष्ठ नागरिक, 18 वर्षांवरील तरुणांनी आपापल्या भागातील आरोग्य केंद्रावर जावून लसीकरण करून घेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने