धुळे, दि. 11
(जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे
अनेक बालके अनाथ झाली. या बालकांचे पालकत्व राज्य शासनाने घेतले आहे.
या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,
असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल,
ग्राम विकास, खार जमिनी विकास, बंदरे, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी
येथे केले.
कोरोना विषाणूमुळे
दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांना पाच लाख रुपये रकमेचे मुदतठेव प्रमाणपत्र
पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज दुपारी जिल्हाधिकारी
कार्यालयातील सातपुडा सभागृहात वितरित करण्यात आले. त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी वान्मथी सी., सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी
तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, की कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांना आपले पालक गमवावे लागले. ही दुर्दैवाची बाब आहे. या बालकांना पाच लाख रुपयांची
मदत देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम झाला.
या बालकांच्या
सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या बालकांना महिला व बालविकास
विभागातर्फे बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्यात आला
आहे. या बालकांसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तो संबंधितांच्या नावे ठेवलेल्या मुदतठेव स्वरूपात ठेवण्यात आले आहेत.
त्यानुसार या बालकांना आज मुदतठेव प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. भदाणे यांनी
'कोविड19' काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची
माहिती दिली. यावेळी संबंधित बालक आणि त्यांचे पालक उपस्थित होते.


