धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून थुंकणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. नितीन पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या नियंत्रणासाठी शासनाने सिगारेट व तंबाखू नियंत्रण कायदा तयार केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवर या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या शिक्षकांचे समुपदेशन करीत त्यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी प्रशिक्षण द्यावे.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. त्याचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस दलाने संयुक्तिकपणे कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले. जिल्हा नोडल अधिकारी डॉ. पाटील यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
Tags
news

