तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी! निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे आवाहन

 



 

धुळे, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) : हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने 1 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्री एक वाजता हातनूर धरणाचे चार दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात 23 हजार 944 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील धुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांनी शासकीय पत्रकान्वये केले आहे.

हातनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याचा येवा लक्षात घेता प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे तापी नदी पात्रात पाणी पातळी वाढणार असल्याने धुळे जिल्ह्यातील तापी नदी काठच्या गावांमधील ग्रामस्थांनी तापी नदी पात्रामध्ये गुरे- ढोरे सोडू नयेत अथवा नदी काठाजवळ जावू नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत. नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी अथवा कुठल्याही कारणास्तव जावू नये.

याबाबत तापी नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करीत सतर्क करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी तहसीलदार, शिरपूर, शिंदखेडा, अपर तहसीलदार दोंडाईचा, गटविकास अधिकारी, शिरपूर, शिंदखेडा, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर यांना दिले आहेत. तसेच ग्रामसेवक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनी दर दोन तासांनी तालुका नियंत्रण कक्षात व तालुका नियंत्रण कक्षांनी दर दोन तासांत जिल्हा नियंत्रण कक्षात अद्ययावत माहिती कळवावी. तसेच मुख्यालय सोडू नये, असेही नमूद करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने