हस्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फ्रसिंग द्वारा उत्साहात संपन्न! *दोंडाईचा (अख्तर शाह*)




*दोंडाईचा (अख्तर शाह*) 

दोंडाईचा मुख्यालय असलेल्या व राज्यभर कार्यविस्तारासोबत नावलौकिक प्राप्त, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि हस्ती को- ऑप. बँकेची ५१ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ ऑगष्ट २०२१ रविवार रोजी व्हीडीओ कॉन्फ्रसिंग द्वारा बँकेचे प्रेसिडेंट कैलास जैन यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्देशानुसार सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फ्रसिंग द्वारे आयोजित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हस्ती बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभचे आयोजन व्हीडीओ कॉन्फ्रसिंग द्वारे केले.
सभेच्या सुरूवातीस बँकेचे दिवंगत संचालक, सदस्य व सभासद यांना श्रद्धांजली अर्पण  करण्यात आली. यानंतर सभेच्या अजेंड्यानुसार सभेचे कामकाज करण्यात आले. यात बँकेचा अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक व बँकेचे ऑडिट रिपोर्ट यांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
गेल्या आर्थिक वर्षात बँकेला निव्वळ नफा रूपये १४६८.८६ लाख इतका झाला आहे. या नफ्याची वाटणी सभेपुढे ठेवण्यात आली. त्यात सभासदांना डिव्हीडंट देण्यासाठी रक्कम रूपये १३५ लाखाची तरतुद करण्यात आली. तसेच अतिरिक्त १०% डिव्हीडंटचीही तरतुद केले असल्याची माहितीही सभेत देण्यात आली. बँकेने ४९ वर्ष पूर्ण करून ५० व्या. सुवर्ण महोत्सवी वर्षात दमदार पदार्पण केले आहे. याबाबतही माहिती सभेत मांडण्यात आली.
तसेच दरवर्षाच्या परंपरेनुसार बँकेच्या २१ शाखांपैकी त्यांच्या व्यवसायातील गटानुसार उत्कृष्ट शाखेची निवड करून त्यांची नावे जाहिर करण्यात आली. यात २०० कोटीवरील व्यवसाय गटात - मुख्य शाखा दोंडाईचा, १०० ते २०० कोटी व्यवसाय गटात - शिरपूर शाखा, ५० ते १०० कोटी व्यवसाय गटात- पिंपळनेर शाखा, २५ ते ५० कोटी व्यवसाय गटात - अक्कलकुवा शाखा आणि १० ते २५ कोटी व्यवसाय गटात - विसरवाडी शाखा व निजामपूर शाखा यांची निवड जाहीर करण्यात आली. सदरचे उत्कृष्ट शाखांचे पुरस्कार कोवीड-19 महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्याचा समारंभ आयोजित करून पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
सदर सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन तथा अहवाल वाचन बँकेचे व्यवस्थापकिय संचालक प्रकाश कुचेरिया यांनी केले. तसेच अध्यक्षीय भाषणात बँकेचे प्रेसिडेंट कैलास जैन यांनी बँकेच्या सभासदांना अतिरिक्त 10% डिव्हीडंट वाटपासाठी रिजर्व बँकेस मान्यता प्रस्ताव पाठविला जाईल असे नमुद केले. कारण बँकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार डिव्हीडंट अदा करणेस बँक सक्षम आहे. सोबतच बँक सभासद व ग्राहक यांनी बँके तर्फे उपलब्ध असलेल्या डिजीटल सेवांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे प्रतिपादन केले. तसेच बँकेच्या संस्थापक संचालक मंडळाच्या प्रती त्यांनी सभेत ऋण व्यक्त केले. व गेल्या ४९ वर्षात ज्ञात अज्ञात व्यक्तींचे बँकेच्या वाटचालीत मार्गदर्शन व सहकार्य मिळाले त्या सर्वांचे प्रती आभार प्रकट केले.
सभेस हस्ती बँक प्रेसिडेंट कैलास जैन, व्हा. प्रेसिडेंट पहलाज माखिजा, संचालक ऍड. अशोकभाई गुजराथी, प्रा. मेजर दिलीप वाघेला,  दिलीप पाटिल, सौ. मधुबाला जैन, संजय दुग्गड, विजय पाटिल, प्रा. पांडुरंग कागणे हे मान्यवर प्रत्यक्ष सभेस हजर होते. तर संचालक मदनभाऊ जैन, राजेंद्रजी चोपडा, डॉ. दिलीप चोरडीया, श्रीमती आशाताई टोणगावकर, शरद पसारी, डॉ. विजय नामजोशी हे मान्यवर व्हर्च्युअली उपस्थित होते. सभेच्या शेवटी बँकेचे जनरल मॅनेजर माधव बोधवाणी यांनी आभार व्यक्त केले. सभेनंतर अनेक सभासदांनी फोन व मेसेज द्वारे सभेचे आयोजन व्यवस्थित व यशस्वी झाल्याचे बँकेला कळविले.
सदर सभेस बँक सभासद बहुसंख्येने ऑनलाइन उपस्थित होते. सभेच्या आयोजनासाठी बँकेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून सभा कार्यक्रमात कुठेही अडथळा न येता यशस्वीरित्या संपन्न झाला.
वरील वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी होण्यासाठी मुख्य शाखा मॅनेजर अनिल मराठे, आयटी मॅनेजर सुनिल गर्गे, सतीष जैन, मनोहर पाटिल, गुलाबसिंग ठोके तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने