प्रतिनिधी, शिरपूर,
जामन्यापाडा येथील नव्यानेच निवडून आलेले सरपंच सरदार हरदास पावरा यांनी कधीही मासिक सभा घेतली नसल्याने सरपंच पदावरून बडतर्फ करणे व त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्यांनी मा. गट विकास अधिकारी पं. स. शिरपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. धुळे व जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर सरपंच 11/02/2020 पद सांभाळल्या पासून एकदाही मासिक सभा घेतली नाही. महाराष्ट्र ग्रा. अधिनियम कलम 36 नुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे बंधनकारक असताना, सरपंच यांनी एकदाही मासिक सभा घेतली नाही. त्यामुळे गावातील विकासकामे रखडलेली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कुठलेही शासकीय काम झाले नाही.
ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होऊन सुरळीतपणे चालावा तसेच सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात विचारविनिमय व्हावा म्हणून एका आर्थिक वर्षात दरमहा मासिक सभा घेणे बंधनकारक आहे. पण जामण्यापाडा येथील सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या नियमांना हरताळ फासला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला असून त्यांनी ग्रा. पं. सदस्य व गावातील नागरिकांची दिशाभूल केली आहे. सदस्यांचे महत्त्व नाकारणाऱ्या आणि मनमर्जी कारभार करणारे सरपंच सरदार पावरा यांना पदावरून बडतर्फ करणे आणि सदस्यत्व रद्द करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्यांनी केली आहे. निवेदनावर आरती रगदिश पावरा, रमीबाई सुभाराम पावरा व विलास कैलास पावरा इ. ग्रा. पं. सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Tags
news
