धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात नागरी व ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, 5 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात 5 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8 ते 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत संचारबंदी व नाईट कर्फ्यू फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लागू केले आहे. या निर्बंधांमध्ये अत्यावश्यक सेवांना सूट देण्यासंदर्भात राज्य शासनाचे 5 एप्रिल 2021 रोजीचे सुधारीत आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार पुढील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील बाबींना सूट देण्यात आलेल्या पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पेट्रेालपंप आणि पेट्रेालियम संबंधित उत्पादने, सर्व मालवाहतूक सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोवाईडर, आयटी सेवा ज्यात महत्वपूर्ण पायाभूत सेवा व सुविधा देणाऱ्या आस्थापना. शासकीय व खासगी सुरक्षा देणाऱ्या सेवा, फळ विक्रेते यांचा समावेश आहे.
पुढील खासगी संस्थांना फक्त सुटीच्या दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी असेल व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण करुन न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 10 एप्रिल 2021 पासून 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. सदरचे प्रमाणपत्र नसल्यास 1 हजार रुपये दंड संबंधितास करण्यात येईल. या संस्थांमध्ये
सेबी आणि सेबीची नोंदणीकृत स्टॉक एक्सचेंज, डिपॉझटरीस, क्लेअरिंग कॉर्पोरेशन आणि सेबी कडे नोंदणीकृत मध्यस्त, रिझर्व्ह बँकेने प्राथमिक स्वरुपात CCIL,NPCI पेमेंट सिस्टिम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत सहभागी, सर्व नॉन बँकिंग वित्तीय संस्था, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, वकिलांची कार्यालये, व्हॅक्सिन, जीवनावश्यक औषधी व फार्मासिटीकल उत्पादनाशी संबंधित अशी कस्टम हाऊस /मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट असोसिएशनची कार्यालये.
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान किंवा सुटीच्या दिवशी विमानतळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक किंवा परत घरापर्यंत प्रवास करणाऱ्या, जाणाऱ्या व्यक्तीस वैध तिकिटाच्या आधारे सूट देण्यात येईल. कारखान्यातील कर्मचाऱ्यांना खासगी बस, व्यक्तिगत वाहनाव्दारे ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेदरम्यान किंवा सुटीच्या दिवशी प्रवास करण्यास औद्योगिक आस्थापनेत कामावर हजर राहण्यास सूट देण्यात येईल. उपासनेची ठिकाणे पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. केवळ लग्न समारंभ/अंत्यविधी साठी सदर ठिकाणी सेवा देणाऱ्या व्यक्तींना आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी सेवा देण्यासाठी सूट देण्यात येईल. सदरची सेवा देण्यासाठी शासनाचे 4 एप्रिल 2021 च्या अटी शर्तींसह परवानगी देण्यात येईल.
एखाद्या विद्यार्थ्यास शारीरीक दृष्टया (Physically attend) परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत / परत घरापर्यंत रात्री 8 वाजेनंतर किंवा सुटीच्या दिवशी प्रवास करण्यास वैध प्रवेशपत्राच्या आधारे सूट देण्यात येईल. सुटीच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्या संदर्भात स्थानिक आपत्ती प्राधिकरणाने स्थानिक परिस्थितीचा विचार करुन शासनाचे 4 एप्रिल 2021 च्या अटी शर्तींसह परवानगी देण्यात यावी किंवा कसे ? याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे. घरकामास मदतनीस/वाहनचालक/स्वयंपाकी यांना त्यांचे काम करण्यास रात्री 8 किंवा सुटीच्या दिवशी सूट देण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक परिस्थीतीच्या आधारे निर्णय घ्यावा. हा आदेश 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 30 एप्रिल 2021 रात्री 11.59 वा.पावेतो लागू राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID-19) उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे
Tags
news
