धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आगामी काहा दिवस कठीण आणि परीक्षेचे असणार आहेत. या काळात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा कदाचित जाणवू शकतो. जिल्हा प्रशासन वैद्यकीय व्यावसायिकांच्या पाठिमागे भक्कमपणे उभे असले, तरी ऑक्सिजन आणि औषधांचा बाहेरुन पुरवठा होतो. त्यांची टंचाई आगामी काळात भेडसावू शकते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय व्यावसायिकांनी ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा किमान 24 तास पुरेल एवढा साठा उपलब्ध करून ठेवतानाच त्यांचा काळजीपूर्वक वापर करावा. त्यानुसार रुग्णांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी वैद्यकीय व्यावसायिकांशी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींसह वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा एकमेव पुरवठादार असून तो धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुरवठा करतो. जिल्ह्याची एकूण मागणी 12.5 टन आहे. तीच परिस्थिती रेमडेसिव्हर या इंजेक्शनची आहे. या इंजेक्शनचा पुरवठा समितीच्या माध्यमातून होत आहे. या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधी, केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. रोज येणारा साठा समिती वितरीत करीत आहे. त्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविली जात आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती कठीण आणि परीक्षा घेणारी आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मानवतेचे, सदभावनेचे दर्शन घडविणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूबाधित अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आगामी काळात रुग्ण संख्या वाढत राहिली, तर ऑक्सिजन आणि औषधांचा कदाचित तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे. त्यासाठीचे नियोजन आतापासूनच केले पाहिजे. तसेच ऑक्सिजन आणि औषधांचा किमान 24 तासांचा साठा आपल्याकडे उपलब्ध असला पाहिजे.
अनेक रुग्ण आवश्यकता नसताना घरीच ऑक्सिजन सिलिंडर लावून घेत आहेत. अशा रुग्णांचा शोध घेवून त्यांना शासकीय कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले पाहिजे. हीच बाब रेमडेसिव्हर या औषधाबाबतही आहे. अनेकजण आवश्यकता नसताना या औषधांचा डोस घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गरजू रुग्ण ऑक्सिजन आणि इंजेक्शनपासून दूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सिजनची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून ऑक्सिजन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यांनी सर्व रुग्णालयांच्या संपर्कात राहून ऑक्सिजन उपलब्धतेबाबतचा अहवाल वेळेत सादर करावा. तसेच मोठ्या रुग्णालयांनी समन्वयाने काम करीत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली महामारीची परिस्थिती हाताळावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदयांनी धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन दिवसांत प्रस्ताव सादर करून कार्यवाही सुरू करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या, रेमडेसिव्हर या औषधाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता वैद्यकीय व्यावसायिकांनी घ्यावी. ज्या रुग्णांना आवश्यक असेल, अशाच रुग्णांना या इंजेक्शनचा डोस द्यावा, असे सांगितले. आयुक्त श्री. शेख यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी वैद्यकीय व्यावसायिकांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी संजय यादव म्हणतात…
* जिल्हा प्रशासन वैद्यकीय व्यावसायिकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे
* उपलब्ध साठ्यानुसार रुग्णांचे नियोजन करावे
* ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर इंजेक्शनचा गैरवापर टाळावा
* घरी ऑक्सिजन लावणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे
* आवश्यक असेल, तरच रेमडेसिव्हर इंजेक्शन वापरावे
* विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
* रुग्णालयांनी पर्यायी आराखडा तयार ठेवला पाहिजे
* नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे
Tags
news
