महिला दिनी महामानवांना स्मरावे



                 
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माझ्या तमाम भारतीय भगिनींना शुभेच्छा देत सविनय वंदन करीत असताना माझ्या मनात आलेला एक सवाल आपणास  विचारावेसे वाटते की, आज हा महिला दिन खुलेपणाने साजरा करायचे भयमुक्त बळ कुणामुळे लाभले ?. जे कुणी शिकले नाहीत, ज्यांना अक्षर ओळख नाही त्यांचे एक वेळ जाऊ द्या. पण क्रांतीसूर्य जोतिबा फुले,ज्ञानज्योती सावित्रीमाई आणि विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानंतर भारतातील आपणा सर्वांना शिक्षणाची कवाडं खुली झाली आणि आपल्याला आज मान ताठ करून समाजात वावरायची संधी मिळाली हे एक वास्तव आहे.आज माझ्या भारतीय भगिनी त्याठिकाणी नाहीत असे एक ही क्षेत्र शिल्लक नाही.आपण कितीही नाकारात असला आणि पुरोगामी असल्याचा दावा करत असला तरी कांहीं प्रमाणात का होईना देव कुठे तरी आहे असे समजणा-या पैकी आपण काही जणी निश्चितच आहात.समजा थोडा वेळ ते गृहीत धरले तरी त्याच देवाने कमी अधिक प्रमाणात साधक बाधक चर्चा, विचार करण्याचे ज्ञान तरी सर्वांना दिलेलंच असणार आहे.परंतु विषमतेवर आधारीत इथल्या जातीव्यवस्थेने सर्वधर्मीय महिलांकडून विचार करण्याचा त्या ज्ञानाचा विकास करण्याचा हक्कच हिरावून घेतला होता हे ही एक वास्तव आहे.आज आपण सर्वजणी ज्या स्तरावर (Position) आहोत त्यासाठी सुरूवातीला आपल्या ओंजळीत "हिंदु कोड बिल" आणि नंतर "संविधान" च्या माध्यमातून आरक्षणाची *कवच कुंडले*विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपण तमाम भारतीय महिला वर्गाला बहाल केली आहेत हे कुणीही आजन्म विसरू नये.हे सर्व आज सांगायचे प्रयोजन म्हणजे आज मोठा गाजावाजा करत हा दिवस साजरा करत असताना  मनुस्मृती मधील दाखल्यानुसार आपण सर्व महिला वर्गाला पशुत्वातून मनुष्यत्वात आणलेल्या महामानवांचे  विस्मरण होऊ नये.
     या महामानवांनी जाती धर्माचा संकुचित विचार न करता समस्त महिलांना विचार आणि आचाराचे स्वातंत्र्य बहाल केले असूनही इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिस्थिती मुळे आणि अज्ञानामुळे आपण सर्व भारतीय भगिनींनी आपल्या उपकार कर्त्याला कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही. उपकार कर्ता म्हणून तर सोडा, बाबासाहेबांना कुठल्या नात्यानेही आपण आपले मानले नाही हे अत्यंत खेदजनक आहे.जातीच्या भिंती पलीकडे जाऊन निदान त्यांना भाऊ तरी मानायला हवे होते. भाऊ म्हणून त्यांच्या प्रतिमेला सण वाराला तरी ओवाळायला हवे होते. आज पर्यंतच्या अज्ञानरूपी अंधकारातून आज बाहेर आले पाहिजे. 
अजूनही वेळ गेलेली  नाही. आपण सर्वांकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या सर्व भगिनींना त्या महामानवाने "हिंदू कोड बिल" आणि "आरक्षण" ही अस्त्र म्हणून बहाल केली आहेत याचे सतत स्मरण महिला दिन साजरा करत असताना असू द्या*✍.                                                   🌻 *हेमलता वठारे* 🌻                                                       *सदस्य,भारतीय जन लेखक संघ महाराष्ट्र राज्य*.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने