शिरपूर : समाजाचे भविष्य घडवणाऱ्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या तरुणांचा सन्मान "तरुण तेजांकित पुरस्कार" देऊन शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्याख्याते प्रा. डॉ. तुषार ऋषिकेश जावरे यांचा गौरव केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आला.
विज्ञान व तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात काम करताना आपल्या कर्तुत्वाने इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरणाऱ्या लखलखत्या नक्षत्रांच्या कर्तबगारीचा सन्मान यावेळी लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात देशभरातील तरुणांमधून करण्यात आला. यात शिरपूर येथील आर. सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ.तुषार जावरे यांची निवड करण्यात आली. या निवड समितीत एनएसई चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ आमटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन आणि ज्येष्ठ संशोधक प्रियदर्शनी कर्वे यांच्या समितीने योग्य टप्प्यावर कामाची ओळख करून देणाऱ्या तरुणांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली आहे. त्यात विज्ञान तंत्रज्ञान अंतर्गत केलेल्या संशोधनासाठी "तरुण तेजांकित" या पुरस्कारासाठी प्रा. डॉ.तुषार ऋषिकेश जावरे यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्राध्यापक तुषार जावरे यांच्या या यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, विद्याविहार हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अशोक कलाल, माजी कुलगुरू डाॕ.के.बी.पाटील, प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, प्रा.सुहास शुक्ल, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
-या संशोधन कार्यामुळे झाला सन्मान-
याप्रसंगी देशभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या सन्मान करण्यात आला. कुपोषण ही आपल्या देशापुढील एक मोठी समस्या. त्यावर मात करण्याचे प्रयत्न अनेक संस्था, व्यक्तींकडून केले जातात. कुपोषणामुळे अकाली प्रसूती आणि त्यातून जन्मलेल्या अर्भकाच्या तसेच नवजात शिशुच्या मेंदूची वाढ परिपूर्ण झालेली आहे किंवा नाही हे एमआरआय प्रतिमांचे शास्त्रीय पध्दतीने विश्लेषण करून ठरवता येते. त्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवता यावी, म्हणून तांत्रिक प्रणाली तयार करण्याच्या विषयात प्रा. डॉ. तुषार जावरे यांनी संशोधन केले आहे. या कार्याबद्दल जावरे यांना कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाने सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून गौरविले आहे. दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या संदर्भातील पूर्व माहिती आणि त्याचा आरोग्य इतिहास याबद्दल इत्यंभूत माहिती उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान ‘हॉस्पिटल अॅ्न्ड पेशंट केअर मॅनेजमेंट सिस्टीम’ या नावाने विकसित करून त्याचे पेटंट नोंदणीसुद्धा तुषार जावरे यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान फार महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या जावरे हे शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात प्रा. डॉ. जावरे हे पीएच.डी. साठी मार्गदर्शक म्हणून नामनिर्देशित आहेत. अभियांत्रिकीतील विविध विषयांवरील त्यांची सात पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशनांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यासोबतच अभियांत्रिकी क्षेत्रातील तीन आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांनी मिळविले आहेत तर विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रिकांमध्ये त्यांचे ५० हून अधिक शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. अभियांत्रिकीच्या शिक्षण संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल बंगळूरू येथील इन्स्टिट्युट ऑफ स्कॉलर्स तर्फे ‘यंग अॕचिव्हर’, चेन्नई येथील सायन्स फादर तर्फे ‘यंग सायंटिस्ट’ अवार्ड, इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स, नाशिकतर्फे ‘प्रॉमिसिंग इंजिनिअर’, एशियन सोसायटी फॉर सायंटिफिक रिसर्चतर्फे ‘यंग इनोव्हेटर अॕन्ड रिसर्चर’ आदी पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक गिरीश कुबेर तर सूत्रसंचालन आणि आभार प्रसिद्ध सिने अभिनेते विनोदी कलावंत वैभव मांगले यांनी मानले.
-पुरस्कारार्थी प्रतिक्रिया-
संशोधनाचा समाजासाठी वापर करणार - प्रा.डाॕ.तुषार जावरे -
"तरुण तेजांकित" या पुरस्काराने माझ्या संशोधनाला कार्याला तेज व झळाळी प्राप्त झाली आहे. समाजातील अंधारलेली स्थिती आहे तेथे प्रकाशमान करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीला पुरेपूर न्याय देण्याच्या प्रयत्न करणार. आम्ही ज्या आदिवासी भागात राहून या संशोधनाला आत्मसात करण्याचे प्रयत्न केलेत, त्या आमच्या शिरपूर तालुक्यात माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी ज्या शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे मला संशोधन कार्याची प्रेरणा मिळत गेली. मला या पुरस्काराच्या रूपाने एक मोठी जबाबदारी मिळाली आहे याची जाणीव ठेवून मी काम करणार आहे.
Tags
news
