जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे : लॉकडाऊनच्या कालावधीत 31 मार्च 2021 पर्यंत वाढ
धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूबाधित आणि गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास, अशा व्यक्तींना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक नियुक्त अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूमुळे (COVID-19) उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रसारीत केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात करोना विषाणूमुळे (COVID-19) उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याने साथरोग अधिनियमानुसार राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून सुरू आहे.
राज्य शासनाच्या 24 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला असून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेल्या निर्बंधांबाबत पुढील निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
सिनेमा हॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स, हॉटेल, रेस्टॉरंट हे आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेसह अटी व शर्तींसह सुरु राहतील. त्यात मास्क घातल्याशिवाय परवानगी देण्यात येवू नये. प्रवेश व निर्गमन करताना थर्मल स्क्रिनिंगचा वापर करावा. ज्या व्यक्तीस ताप असेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक राहील. संबंधित आस्थापनांनी प्रवेशित व्यक्तींना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदीबाबत आवश्यक ते मनुष्यबळ आस्थापनेच्या ठिकाणी ठेवणे अनिवार्य राहील.
शॉपिंग मॉल पुढील अटी व शर्तींसह सुरु राहतील. मास्क घातल्याशिवाय परवानगी देण्यात येऊ नये. प्रवेश व निर्गमन करताना थर्मल स्क्रिनिंगचा वापर करावा. ज्या व्यक्तीस ताप असेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक राहील. संबंधित आस्थापनांनी प्रवेशीत व्यक्तींना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे इ.बाबत आवश्यक ते मनुष्यबळ आस्थापनेच्या ठिकाणी ठेवणे अनिवार्य राहील.
मॉलमधील थिएटर, रेस्टॉरंट किंवा मॉलमधील इतर आस्थापनांनी या अगोदरच्या किंवा आता लागू केलेल्या निर्बंधांचे पालन केले आहे किंवा कसे हे सुनिश्चित करणे. निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सदरचा मॉल बंद करण्यात येईल किंवा केंद्र सरकारकडून कोविड-19 च्या साथीची आपत्ती म्हणून सदरचा काळ अधिसूचित होईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच मॉल मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड देखील करण्यात येईल.
सर्व प्रकारचे सामाजिक,सांस्कृतीक,राजकीय,धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सदर परिसराच्या मालकास दंड आकारण्यात येईल. तसेच सदरची मालमत्ता केंद्र सरकारकडून कोविड-19 च्या साथीची आपत्ती म्हणून सदरचा काळ अधिसूचित होईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. फक्त लग्न समारंभासाठी कोविड नियमावलीचे पालन करुन 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी अनुज्ञेय राहील. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सदर परिसराच्या मालकास दंड आकारण्यात येईल. तसेच सदरची मालमत्ता केंद्र सरकारकडून कोविड-19 च्या साथीची आपत्ती म्हणून सदरचा काळ अधिसूचित होईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांवर याबाबत नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राहील.
गृह विलगीकरणाबाबत खालील अटी व शर्ती बंधनकारक राहतील. गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती स्थानिक अधिकारी तसेच वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येईल. जेणेकरुन सदर व्यक्ती ही त्यांच्या देखरेखीखाली राहील. कोविड-19 रुग्णाच्या घराच्या दर्शनी भागात सुरवातीपासून 14 दिवसांसाठी माहितीचा फलक लावण्यात यावा. गृह विलगीकरण व्यक्तीच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या हालचाली शक्य तितक्या मर्यादित व विना मास्क फिरणार नाहीत याची प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. विलगीकरणाचे कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक नियुक्त अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवावे.
सर्व कार्यालये आरोग्य विभागासह व अत्यावश्यक सेवेसह 50 टक्के उपस्थितीत कामे करतील. शक्य असल्यास घरुन कार्यलयीन कामे करण्यास प्राधान्य देण्यात यावे. एखाद्या कार्यालयामध्ये कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निर्देशानुसार सदरचे कार्यालय पुढील कालावधीपर्यंत बंद ठेवण्यात यावे. धार्मिक स्थळांमध्ये कमीत कमी व्यक्तींना सोशल डिस्टन्सिंगसह प्रवेश देण्यासंदर्भात संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी नियोजन करावे. शक्यतो धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या व्यक्तींची ऑनलाईन प्रणालीव्दारे निश्चिती करुन प्रवेश देण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात. त्यात मास्क घातल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवेश व निर्गमन करताना थर्मल स्क्रिनिंगचा वापर करावा.तसेच ज्या व्यक्तीस ताप असेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक राहील. संबंधित आस्थापनांनी प्रवेशीत व्यक्तींना मास्क वापरणे,सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे इ.बाबत आवश्यक ते मनुष्यबळ आस्थापनेच्या ठिकाणी ठेवणे अनिवार्य राहील.
कोविड-19 बाबतचे प्रतिबंधात्मक आदेश 31 मार्च 2021 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID-19) उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे.
Tags
news