धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत वाढला आहे. असे असले, तरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांनी कोरोना विषाणूविषयक नियमांचे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 269 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 16 हजार 277 रुग्ण बरे होवून घरी परतले असून 395 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार 597 रुग्ण श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, एसीपीएम डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, महानगरपालिकेचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेन्टिलेटर्ससह 35 खाटा, ऑक्सिजनयुक्त 100, तर सर्वसाधारण 350 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 208 रुग्ण उपचार घेत असून ऑक्सिजनचा टँक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. याशिवाय एसीपीएम रुग्णालयात 100, जिल्हा रुग्णालयात 60, महानगरपालिकेचे जिल्हा रुग्णालयात 60, उपजिल्हा रुग्ण्णालय, शिरपूर येथे 80, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे 40, साक्री येथे 30 खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश खाटा या ऑक्सिजनच्या सुविधेसह आहेत. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे 1800 खाटा उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वॅब कलेक्शन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या औषधोपचारसाठी आवश्यक सर्व साधनसामग्री, औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एकीकडे कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार सुरू असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. 91 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून फ्रंट लाइनवरील 63 टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासकीय, महानगरपालिकेसह खासगी रुग्णालये मिळून 56 आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून रोज सरासरी साडेपाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे वास्तव आहे. बाधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील किमान 20 जणांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांच्या संपर्कात आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत.
- दिलीप जगदाळे, जिल्हाधिकारी, धुळे
जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे म्हणतात…
* प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा
* ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे
* हात सॅनेटायझर अथवा साबणाने वेळोवेळी स्वच्छ करावेत
* तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वित
* गृहविलगीकरणातील व्यक्तींवर आरोग्य विभागाचे लक्ष
* विवाह सोहळ्यांसाठी फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा
* विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदारांची पूर्व परवानगी आवश्यक
* ग्रामसेवक, तलाठी, पोलिस विभागावर जबाबदारी
* मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार
* नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये
* धुळे जिल्ह्यात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश
* अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे
Tags
news