स्त्रियांच्या आयुष्यातील अज्ञान रुपी अंधःकारला दूर करणाऱ्या भारतीय इतिहासातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री- शिक्षणाच्या प्रणेत्या, कवयित्री, समाजसुधारक, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन.
ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे (पाटील) व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे वडील गावचे पाटील होते. इ.स. १८४० साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतीराव फुले यांचेशी झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे मूळ आडनाव गोरे असले तरी त्यांना फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता त्यांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिबांना त्यांच्या स्वतःच्या परिवाराने फार विरोध केला. जुन्या चालिरीतींचा पगडा आणि समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाचीच परवानगीच काय तर तसा विचार करणे सुद्धा पाप होते.
या करता सावित्रीबाईंनी खुप संघर्ष केला आणि या रूढी ला तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी व पती ज्योतिबांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली. ही शाळा म्हणजे भारतातील नव्हे तर आशियाखंडातील पहिली मुलींची ठरली. या शाळेत एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई याच शाळेच्या शिक्षिका होत्या आणि अश्या तऱ्हेने त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका बनल्या. पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती.
या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.
सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.
पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.
केवळ शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सती प्रथा रोखण्यासाठी,पुनर्विवाह साठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी काशिबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेतली आणि वेळेवर तिची प्रसुती केली. नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक म्हणून घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले जो नंतर एक प्रसिद्ध डॉक्टर बनला. त्याच बरोबर स्त्री-बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी नवजात मुलांसाठी एक आश्रमही उघडला.
सावित्रीबाई कवियत्री म्हणुन देखील या समाजाला परिचीत आहेत “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर” यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहाता येतात.
ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आपल्या देशात ज्यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले, रूढीवादी परंपरेतून स्त्री मुक्तीचे द्वार उघडले आणि ज्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी म्हणता येईल, अशा सावित्रीबाई फुले यांचा देश नेहमीच ऋणी राहील. आपल्या देशातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहणार नाही व साक्षरतेचे प्रमाण १००% होईल तसेच एकही स्त्री-भ्रूणहत्या होणार नाही असा निर्धार करून सावित्रीबाईंना त्यांच्या स्मृतीदिनी अभिवादन करूया.
प्रा. सौ. माधुरी पाटील
द. मा. बारी कनिष्ठ महाविद्यालय, धुळे
Tags
news
