प्रत्येक विक्रेत्याची रॅपिड अँटिजेन चाचणी करावी! : जिल्हाधिकारी संजय यादव होळी, धूलिवंदनासाठी निर्बंध





कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक विक्रेता, दुकानदार आणि दुकानातील कामगारांची रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. ही चाचणी दर आठवड्याला करावी, असे निर्देश निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विजय जाधव, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, डॉ. मधुकर पवार, डॉ. महेश मोरे, डॉ. शिवचंद्र सांगळे, डॉ. दीपक शेजवळ, ‘आयएमए’चे डॉ. महेश अहिरराव, डॉ. हेमंत भदाणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करणे गरजेचे आहे.  त्यामुळे धुळे शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक फेरीवाला, भाजीपाला, दूध, फळविक्रेता, सर्व दुकानदार, दुकानातील कामगारांची रॅपिड अँटिजेन चाचणी मोहीमस्तरावर करावी. कन्टेन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिरपूरमध्ये  ऑक्सिजन युक्त 100 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करावे.
खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता नसताना ऑक्सिजनयुक्त बेड अडविणाऱ्या रुग्णांचा शोध घेवून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. कोविड केअर सेंटरमध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव दर्शनी भागावर संपर्क क्रमांकासह प्रदर्शित करावे. याशिवाय कोविड केअर सेंटरच्या प्रभारी अधिकाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे. याबाबतचा पूर्तता अहवाल तातडीने सादर करावा. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागावर बिलाबाबत तक्रार असल्यास कोणाकडे संपर्क साधावा याविषयीचा फलक लावावा. त्याची पाहणी आपण स्वत: करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.
रेमडेसिव्हिर औषधांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी. औषधे जादा दराने विक्री होत असल्यास तातडीने कारवाई करावी. आरोग्य यंत्रणेने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतची खातरजमा जिल्हा शल्यचिकित्सकांनी करावी. पेरेजपूर, ता. साक्री येथील जवानाच्या मृत्यूप्रकरणी उपविभागीय अधिकारी, धुळे यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. 
होळी, धूलिवंदनासाठी निर्बंध
रविवारी (28 मार्च) होळी आणि सोमवार 29 मार्च 2021 रोजी धूलिवंदनाचा सण आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी होळी आणि धूलिवंदनाचा सण साधेपणाने साजरा करावा. या कालावधीत नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात या कालावधीत निर्बंध घालण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना व सूचना लवकरच निर्गमित करण्यात येतील. नागरिकांनी या कालावधीत नियमांचे पालन करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने