सिकलसेल आजारावरील उपचारासाठी निधीची तरतूद- ॲड.के.सी.पाडवी




नंदुरबार दि.15- जिल्ह्यातील सातपुडा परिसरात आढळणाऱ्या सिकलसेल आजरावरील उपचारासाठी आवश्यक निधी  देण्याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या आजाराच्या शस्त्रक्रीयेसाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथे ग्रामीण रुग्णालय आणि आरोग्य विभागातर्फे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जान्या पाडवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.ओंकार वळवी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाडवी म्हणाले, सिकलसेल हा अनुवंषिक  आजार आहे. सुशिक्षित पिढीने तरी या आजाराविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील जनतेने शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन वेळेवर उपचार घ्यावेत. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून नये आणि  रुग्णालयातील डॉक्टरांची वेळीच सेवा घ्यावी. ग्रामीण जनतेसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. कोरोना काळात डॉक्टरांनी  चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती वळवी म्हणाल्य, आदिवासी  जनतेला उपचारासाठी शहरात जावे लागते व त्यात वेळ वाया जात  असल्याने जमाना येथे तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

 प्रास्ताविकात डॉ.भोये यांनी शिबिराची माहिती दिली. शिबिरात विविध 15 आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना  आमंत्रित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी तळोदा किंवा नंदुरबार येथे संदर्भित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात साधारण 550 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे गरजूंना चष्मे वाटप  करण्यात येणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने