हरयाणामधील जींद जिल्ह्यामध्ये पोलिसांनी एका प्रेमवीर चोराला अटक केली आहे.
बंटी नावाच्या या चोराने तीन जिल्ह्यांमध्ये एकूण १४ ठिकाणी चोऱ्या केल्याचं उघड झालं आहे.
पोलीस चौकशीदरम्यान या चोराने चोऱ्या करण्यामागील कारणाचा खुलासा केला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला.
बंटीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला त्याच्या प्रेयसीला व्हॅलेंटाइन डेनिमित्त महागड्या वस्तू गिफ्ट करायच्या होत्या.
त्यामुळेच त्याने चोऱ्या करण्यास सुरुवात केल्याचे सांगितलं आहे.
आरोपी बंटी हा राम कॉलीनीमधील रहिवाशी असून त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तुल, दोन रिवॉलव्हर आणि अनेक जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.
आरोपी बंटीविरोधात जींदबरोबरच कुरुक्षेत्र, टोहानासहीतच इतर अनेक जागी ११ गुन्हे दाखल आहेत.
आपल्या प्रेयसीला महागडी भेटवस्तू देण्यासाठी चोरी करण्यास सुरुवात केल्याचे बंटीने पोलिसांना सांगितलं.
सी.आय.ए. इन्चार्ज असणाऱ्या मनोज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी आय.एस.आय. सुरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी सफीदो रोड नाक्यावर तैनात होती.
त्याचवेळी त्यांना एक तरुण एकलव्य स्टेडियमजवळ बेकायदेशीर हत्यारं घेऊन पोहचल्याची माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांनी एकलव्य स्टेडियमजवळून बंटीला ताब्यात घेतलं.
त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली असता त्याच्या बॅगेतून दोन पिस्तुल आणि दोन रिवॉलव्हर तसेच काडतूसं सापडली.
प्रेयसीला व्हॅलेंटाइन्स डे निमित्त महागडं गिफ्ट देण्याचा विचार असल्याने मी मागील वर्षापासून चोऱ्या करत असल्याचं बंटीने पोलिसांना सांगितलं.
बंटीने आमची तीन ते चार जणांची टोळी असल्याचंही पोलिसांना सांगितलं.
