शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार साखर कारखाना मागील 8 ते 10 वर्षांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी तो सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत माजी खासदार स्व.शिवाजीराव दादा पाटील यांनी सुरू केलेला शिरपूर तालुक्यातील सर्वात मोठा सहकारी प्रकल्प तो म्हणजे साखर कारखाना. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या मदतीने शिवाजीराव पाटील यांनी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाची गंगा आणली होती. मुबलक पाणी आणि सुपीक काळी कसदार जमीन यामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत होते यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत होता. दिवंगत खासदार शिवाजीराव पाटलांच्या काळात या सहकारी साखर कारखाण्यामुळे शिरपूर तालुक्यातच नव्हे तर धुळे,जळगाव नंदुरबार जिल्हातील शेतकऱ्यांपासून तर कामगार,लहान मोठे व्यापारी, यांना मोठा आर्थिक फायदा होत होता. करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होत होती. शेतकरी सुखी समाधानी होता.
परंतु स्व.शिवाजीराव पाटील यांच्या पश्चात मात्र वैभव संपन्न असलेला कारखाना राजकीय अनास्थेमुळे 8 ते 10 वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे. यामुळे शेतकरी मोठया संकटात सापडला असून ऊस लागवड करून दूर दूरच्या कारखान्यांना ऊस बळजबरीने उधारीवर विकावा लागतो यामुळे कधी अपुरे पैसे भेटतात तर कधी पैसे भेटायला टाळाटाळ होते. यामुळे कधीकाळी संपन्न आणि स्वावलंबी असलेला शेतकरी मात्र परावलंबी झाला आहे.आज मोठ्या आशेने शेतकऱ्यांचे लाडके नेते शरदचंद्र पवार साहेबांकडे शेतकरी आस लावून बसले आहेत. यापूर्वी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी मुंबई येथील भेटी प्रसंगी कारखान्याविषयी सविस्तर चर्चा पवार साहेबांसोबत केली होती.
आज अखेर शिरपूर तालुक्यातील एकही सहकारी प्रकल्प सुरू नसून साखर कारखान्यासह सूतगिरणी, दूध संघ, शेतकी संघ ,बागायतदार संघ यासारखे सर्वच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे प्रकल्प आज बंद आहेत.
धुळे जिल्ह्यासह शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचे खरे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी या बंद प्रकल्पांपैकी कमीतकमी साखर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करून साखर कारखाना सुरू करावा अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ जितेंद्र ठाकूर आणि शेतकरी संघर्ष समितीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे केली आहे.
Tags
news
