कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
धुळे दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश मिळविले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही गंभीर बाब असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणारे आणि निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. तसेच त्याची पाहणी पोलिस अधीक्षक, महानगरपालिकेच्या आयुक्तांसह गुरुवारी स्वत: करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा पुनवर्सन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. महेश मोरे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच पॉझिटिव्हीटी दरही वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांची चाचणी घेतली पाहिजे. आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच रॅपिड ॲटिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी. त्यासाठी महानगरपालिकेने मुख्य चौकांमध्ये स्टॉल सुरू करावेत. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर कार्यान्वित करावेत. सर्वाधिक रुग्ण धुळे शहरात आढळून येत आहेत. ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे, अशा भागात कन्टेन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विवाह सोहळ्यांसाठी 50 व्यक्तींची मर्यादा आहे. तसेच पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. संयुक्त पथकांनी मंगल कार्यालयांना भेटी देत पाहणी करावी. क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ कठेार कारवाई करावी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी झोनल अधिकाऱ्यांना सूचना देत निगराणी ठेवावी. होम क्वारंटाइन असलेल्या नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. ते नियमांचे पालन करीत नसतील, तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. त्यासाठी तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटर तत्काळ कार्यान्वित करावेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्यक मनुष्यबळाचे व्यवस्थापन करावे. त्याबरोबरच आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, औषधे यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. शाळांबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालक- शिक्षक समिती यांच्याशी चर्चेनंतर निर्णय महानगरपालिकेने निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक श्री. पंडित म्हणाले, विना मास्क फिरणाऱ्यांविरुध्द पोलिस दलातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर आयुक्त श्री. शेख यांनी धुळे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
Tags
news
