मास्क न लावल्यास होणार 200 रुपयांचा दंड : जिल्हादंडाधिकारी दिलीप जगदाळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती




धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक जागी थुंकण्यास बंदी घालण्यात आली असून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज जिल्हादंडाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे.

त्यातील विविध तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे, त्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे निर्देश दिलेले आहेत. तसेच धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. संशयित व्यक्तीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती धुळे जिल्ह्यात उदभवू नये म्हणून पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.
त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये पुढील आदेश होईपर्यंत चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे, उपहार गृहे, बार, हॉटेल, रेस्टॉरंट तत्सम ठिकाणे, खासगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे व तत्सम ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व इतर तरतुदींचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबतची माहिती एकत्रितरित्या संकलित करण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भामरे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी विभाग निहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
समन्वय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना कामात मदत मिळण्यासाठी त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्या स्तरावरुन करावयाची आहे. विभागनिहाय नोडल अधिकारी व त्यांचे पदनाम असे : जिल्हा परिषद अंतर्गत (ग्रामीण क्षेत्र), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद, धुळे, महानगरपालिका क्षेत्र- उपायुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे, नगरपरिषद/नगरपालिका क्षेत्र- जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, पोलिस विभाग- पोलिस उप अधीक्षक, (गृह) पोलिस अधीक्षक, कार्यालय, धुळे, शिक्षण विभाग- शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद,धुळे, परिवहन विभाग- मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे, अन्न प्रशासन विभाग- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग,धुळे. वरील प्रमाणे नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे, उपहार गृहे/ बार/ हॉटेल/ रेस्टॉरंट व तत्सम ठिकाणे, खासगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे व तत्सम ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व इतर तरतुदींचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत वार्ड, प्रभागनिहाय व ग्रामीण भागात गावनिहाय एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र पथकाची स्थापना करावी. या पथकाने त्यांचे कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे तपासणी करावी.
मास्कचा वापर करणे :- सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व वाहतूक, प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. एखादा व्यक्ती, नागरिकाने चेहऱ्यावर मास्क न लावल्याचे आढळल्यास 200 रुपये दंडाची आकारणी करावी. दुकाने, आस्थापना, फळे, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, किरकोळ वस्तू विक्रेत्यांनी कोणत्याही दुकानात, आस्थापनेत एक वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाही याची दक्षता घ्यावी. विना मास्क दुकानात येणाऱ्या कोणत्याही ग्राहकास दुकान मालक/चालकाने माल/सुविधांचा पुरवठा करु नये. सर्व दुकाने/आस्थापना येथील दुकान मालक/चालक,कर्मचारी व ग्राहकांना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. वर नमूद बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितांस रुपये 200/- मात्र दंडाची आकारणी पथकाने करावी. याबाबतीत संबंधित दुकान मालक /चालकांनी वर नमूद बाबींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास तत्काळ दुकान/आस्थापना सील करण्याची कार्यवाही करावी.
गर्दी करणे : एका ठिकाणी Social Distancing चे पालन न करता आनावश्यकरित्या 5 पेक्षा जास्त गर्दी करुन जमा झालेले नागरिक, व्यक्ती (वैधानिक सभा, आपत्कालिन व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था लग्नसमारंभ व अंत्यविधीकरीता 50 व्यक्ती वगळून) आढळून आल्यास प्रति व्यक्ती रुपये 200/- मात्र दंडाची आकारणी करावी. संबंधितांवर नमूद कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी. थुंकण्यास बंदी : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून रक्कम रुपये 200/- मात्र दंडाची आकारणी करावी. वरील प्रमाणे दंडात्मक कारवाईतून प्राप्त होणारी रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या शासकीय लेख्यात जमा करावी. तसेच नोडल अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी दिले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने