सावीत्रीबाई फुले जयंतीनिमित्त नंदुरबार येथे आदर्श महिला शिक्षिकांचा गौरव



■■ सावीत्रीबाई फुले जयंतीनिमित्त नंदुरबार येथे आदर्श महिला शिक्षिकांचा गौरव

◆◆ महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 

◆◆ स्री शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकते -  खासदार हिनाताई गावित

शहादा (प्रतिनिधी) :- महात्मा फुले युवामंचच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्ह्यातील आदर्श महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
     राज्य शासनाने या वर्षापासून ३ जानेवारी हा दिवस स्री शिक्षणाचे प्रणेते तसेच पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या महिलांनाही त्यांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या कामाची दखल म्हणून जिल्ह्यातील महिला शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे आयोजन म.फुले युवा  मंचच्या वतीने करण्यात आले होते. त्या अनुषंगाने  युवा मंचच्यावतीने जिल्ह्यातील महिला शिक्षिकांना आदर्श महिला शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नंदुरबार येथे ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     यावेळी अध्यक्ष म्हणून माननीय खासदार डॉ. हिनाताई गावित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार विजयकुमार गावित, युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी, मधुकर माळी,विजय माळी सर डॉ्. संगीता पाटील, धनराज माळी, ईजाज बागवान यांची उपस्थिती होती.
      शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ३५ महिला शिक्षकांना आदर्श महिला शिक्षक पुरस्कार खासदार हिनाताई गावित आमदार विजयकुमार गावित व महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अंगणवाडी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आठ अंगणवाडी सेविकांनाही पुरस्कार देण्यात आला.  
     आदर्श महिला शिक्षिका पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ११० प्रस्ताव प्राप्त झाले होते.
     समाजातील सर्व घटकांना दिशा देण्याचे काम फुले दाम्पत्यांनी केले आहे. सगळ्यांनी त्यांच्या विचारांचे पालन करून ते आचरणात आणायला हवे, असे विजकुमार गावित यांनी सांगितले.  तसेच युवामंचच्या वतीने खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला असून युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी हे नेहमी सामाजिक कर्तव्य म्हणून  शैक्षणिक, रोजगार, कृषी क्षेत्रात  योगदान देत असतात, असे गौरवोद्गार मा. गावित यांनी काढले.
       अध्यक्षीय भाषणात खा. हीनाताई गावित यांनी शासनाने सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय अतिशय चांगला असल्याचे सांगितले.  कठीण परिस्थितीत महिलांना शिक्षण देण्याचे काम सावित्रीबाईंनी  केल्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. आज असे कोणतेच क्षेत्र असे नाही की तिथे महिलांनी भरारी मारलेली नाही. स्री शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकते. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यात सिंहाचा वाटा हा महिला शिक्षकांचा असतो. घरातील सर्व कामे सांभाळून शाळेत मुलांना घडविण्याचे काम करणाऱ्या महिला खरेच कौतुकास पात्र आहेत असे सांगून मुलींचे प्रमाण कमी होणे हा चिंतनाचा विषय असून जिल्ह्यात युनिसेफच्या माध्यमातून कुपोषण संपविणार असल्याचे हिनाताई  यांनी सांगितले.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन माळी, राकेश भादाणे, एजाज बागबान यांनी परिश्रम घेतले. तर विशेष सहकार्य विजय सुरेश माळी यांचे लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र जाधव केले तर आभार सौ. पुष्पा जाधव यांनी मानले.

◆◆ पुरस्कार प्राप्त महिला     
         सविता पटेल, नीलिमा माळी, कविता माळी, कल्पना पटेल, मीनल राणे, चेतना पाटील, सुनिता पाटील, मीना बागुल आदी महिला शिक्षकांचा समावेश होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने