शिरपूर : दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने विभागातील क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आणि याच पुरस्कारासाठी आपल्या शिरपूर शहरातील कन्या मयुरी भामरे यांची निवड झालेली असून येत्या 23 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 4:30 वाजता हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे पार पडणार आहे.
मयुरी भामरे यांना लहानपणापासूनच कॅरम या खेळात अभिरुची निर्माण झाली. यात कॅरम खेळामध्ये त्यांनी अनेक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून आपल्यासह आपल्या शिरपूर शहराचा नावलौकिक मिळविला आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्णपदक, राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक, महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा 14 वर्षे वयोगट चार वर्षे, 18 वर्षे वयोगट चार वर्षे, एकवीस वर्षे वयोगट दोन वर्षे या वयोगटांमध्ये प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत कामगिरी केली. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याची टीमला खेळून रायपूर छत्तीसगड येथे सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय चॅम्पियन ची स्वप्न सिद्ध केले. तसेच पश्चिम विभागीय राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. अशा स्वरूपाच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी सुवर्ण पदक पटकावले असून या खेळ प्रकारात त्यांनी उत्तम यशाला गवसणी घातलेली आहे.
त्यांचे दहावी, बारावी बी. कॉम. हे सर्व शिक्षण आपल्या शिरपूर शहरात झालेले असून त्यांनी पाच वर्षे आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे कॅरम प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावलेली आहे.
सध्या एस. व्ही. के. एम. संस्था संचालित मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूल तांडे ता. शिरपूर येथे कॅरम प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात देखील आपल्या हातून उत्तम दर्जाची कॅरम खेळाडू निर्माण करण्याचा मानस आहे.
माजी मंत्री आमदार तथा एस व्हीके एम संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्षा माननीय सौ. जयश्रीबेन पटेल, प्राचार्य पी. सुभाष नायर, धुळे जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव कैलास कंखरे, अशोक दुधारे (छत्रपती पुरस्कार प्राप्त), प्रशिक्षक साजिद सय्यद, अनिल मोरे, राजेश महंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
