शिरपूर : येथील एच. आर. पटेल फार्मसीला एआयसीटीई व भारतीय उद्योग संघाच्या सर्व्हेमध्ये सुवर्ण मानांकन प्राप्त झाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी दिली.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व भारतीय उद्योग संघ (सीआयआय) यांच्या इंडस्ट्री लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट 2020 च्या सर्व्हेमध्ये शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाला सुवर्ण मानांकन मिळाल्याची बाब अभिमानास्पद आहे. सदर मानांकन हे एआयसीटीई - सीआयआय सर्व्हेचे उद्दीष्ट पूर्ण करत म्हणजे महाविद्यालय व उद्योगांच्या भागीदारीच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करणे व तांत्रिक संस्था आणि उद्योग यांच्यात विविध सहा मूलभूत मापदंडांवर जसे की अभ्यासक्रम, प्राध्यापक, प्रशासन - पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, संशोधन आणि सेवा, प्रकल्प आणि कौशल्य विकास इत्यादी निकषांद्वारे ठरवले जाते. सदर सर्व्हे सुपूर्ण भारतातील तांत्रिक शिक्षण संस्थांचे उद्योग संस्था व समूहांशी असलेल्या सहकार्यपूर्वक संबंधांची पाहणी व पडताळणी करून मानांकन जाहीर केले जाते. भारतीय उद्योग संघ भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यातून हा सर्व्हे करून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उभे करण्याचा ए.आय.सी.टी.ई. चा प्रयत्न आहे.
सदर मानांकनाने अजून एक मनाचा तुरा महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला गेलाय तसेच महाविद्यालय हे राष्ट्रीय स्तरावरील एन. बी. ए., आय. एस. ओ. ९००१:२००८ मानांकित व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून “अ” दर्जा प्राप्त महाविद्यालय असून आतापर्यंत महाविद्यालयाला विविध शासकीय व निमशासकीय विभागांकडून सुमारे २.५० कोटींच्या वर संशोधन निधी प्राप्त झाला आहे. महाविद्यालया कडून सुमारे ५०० च्या वर शोधनिबंध व २० पुस्तके विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकांत प्रकाशित झालेले आहेत. महाविद्यालयाकडून एकूण ५ पेटंट अर्ज जमा झाले असून एका पेटंटला भारत सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक उपकरणे व सोयी सुविधांनी सज्ज असलेली “अतिसुष्मप्रयोगशाळा” उभारण्यात आली आहे. त्यात नॅनो टेक्नॉलॉजी, कर्करोग, अल्झायमर वगैरे संबंधित संशोधनासाठी लागणारे एस.पी. आर. स्पेक्ट्रोमीटर, स्पेक्ट्रोफ्लुरोमीटर, पार्टिकल साईझ अनालईझर इत्यादी अद्यावत उपकरणे उपलब्ध आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणे महाविद्यालयात सहज शक्य झाले आहे. ट्रोईका फार्मासुटीकल्स, अहमदाबाद यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट्ट पदवूत्तर शोध प्रबंधासाठीचा रजनीभाई व्ही. पटेल पुरस्कार सलग तिसऱ्यांदा महाविद्यालयाला मिळाला आहे. भारतातील विविध महाविद्यालयातून शेकडो संशोधक या स्पर्धेत सहभागी होतात व त्यातून उत्कृष्ट्ट अश्या प्रबंधाला पारितोषिक देवून गौरविण्यात येते. “अविष्कार” ही संशोधन स्पर्धा जिल्हा, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तर अश्या विविध पातळींवर दरवर्षी घेण्यात येत असते त्यात अशीच यशाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना व संशोधनाच्या आधारे सलग सात वर्षांपासून विविध पातळींवरील पारितोषिकांवर शिक्कामोर्तब करीत सदर स्पर्धेत महाविद्यालयांने विविध विषयातील सर्वाधिक पारितोषिके पटकावून विद्यापीठात नावलौकिक मिळवलाय. तसेच २०२० चे विद्यापीठाचे फार्मसी शाखेतील सुवर्णपदकाचा मान महाविद्यालयाच्या विद्यार्ठीनेने पटकावलाय. महाविद्यालयाचा ८० टक्के प्राध्यापक वर्ग पीएच. डी. धारक असून उर्वरीत प्राध्यापक यांचे पीएच. डी. संशोधन चालू आहे.
महाविद्यालयातर्फे “समाज उपयोगी संशोधनाला” नेहमीच प्राधान्य दिले जावून समाज उपयोगी संशोधन केले जाते. त्यात समुद्राच्या पाण्यातून गोड पाण्याची निर्मितीचा प्रयोग, मक्याच्या कानिसापासून बनविलेले जलशुद्धीकरण उपकरण, कमी पाण्यातून शेती सिंचन, नॅनो टेक्नॉलॉजी, फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी जैव-संवेदानायुक्त निदान व उपचार पद्धती इत्यादींचा समावेश आहे. महाविद्यालयातर्फे आरोग्याशी निगडीत विविध प्रकल्प व शिबिरांचे नियमित आयोजन केले जाते. त्यामध्ये, मोफत रक्तगट व आरोग्य तपासणी शिबीर, सिकेलसेल निदान शिबीर, मासिक पाळी जनजागृती अभियान, स्तनपान मार्गदर्शन शिबीर, कुटुंब नियोजनाबद्दल जनजागृती तसेच मधुमेह, अवयव दान, ग्रामीण आरोग्य व्यवस्था, आत्महत्याप्रतिबंध यावरील चर्चासत्रे, पथनाट्ये व जनजागृतीपर रँली यांचा समावेश आहे व ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर कॅम्प आयोजित करणारे महाराष्ट्रातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. तसेच महाविद्यालयाचा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उदिष्टाने नियमित कॅम्पस इंटरव्ह्यूचेही आयोजन करत असते. महाविद्यालयाचे बहुतांश माजी विद्यार्थी हे यु. एस., कॅनडा, दुबई, यु. के. इत्यादी देशात कार्यरत असून त्यांची मार्गदर्शन सत्रे विद्यमान विद्यार्थ्यांसाठी नेहमी आयोजित केली जातात.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी कौतुक केले.
Tags
news
