धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 14, 15 आणि 18 जानेवारी 2021 या दिवशी जिल्ह्यातील सर्व सीएल- 3 (देशी दारू किरकोळ विक्री) अनुज्ञप्त्या, एफएल- 2 (विदेशी दारू सीलबंद बाटली किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती, एफएल – 3 (परमीट रूम), सीएलएफएलटीओडी- 3 (देशी दारू सीलबंद बाटलीतून किरकेाळ विक्री) अनुज्ञप्ती आणि एफएएल/बीआर- 2 (बिअर शॉपी) व ट. ङ -1 (ताडी) इत्यादी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार 218 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान, तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान प्रक्रिया आहे त्या कार्यक्षेत्रात मतदानाच्या अगोदरचा संपूर्ण दिवस म्हणजे 14 जानेवारी 2021, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान प्रक्रिया आहे त्या कार्यक्षेत्रात मतदानाचा संपूर्ण दिवस म्हणजे 15 जानेवारी 2021 आणि ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान प्रक्रिया आहे ते कार्यक्षेत्र व 18 जानेवारी 2021 रोजी तहसीलदार निश्चित करतील त्याठिकाणी मतमोजणी संपेपर्यंत अनुज्ञप्त्या बंद राहतील.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या (दुकाने) उघडे ठेवू नयेत. तसेच विक्री व अन्य व्यवहार करू नयेत. बंदच्या दिवशी दुकाने उघडी आढळल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
news
