राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी 31 जानेवारीपर्यंत आधार क्रमांक जोडून घ्यावा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांचे आवाहन




धुळे, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधार कार्डसह जावून 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार सीडिंगचे काम पूर्ण करुन घ्यावे.  अन्यथा फेब्रुवारी 2021 पासून त्यांचा अन्नधान्य पुरवठा थांबविण्यात येईल. त्यामुळे लाभार्थ्यांनी 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार लिंकिंगचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.
राज्य शासनाने 22 डिसेंबर 2020 रोजी पत्र जारी केले आहे. त्यात याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल लिंकिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी  स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधार कार्डची छायांकित प्रत व अंगठा दिल्यास eKYC द्वारे आधार सीडिंग पूर्ण होईल.
धुळे जिल्ह्यात 2 लाख 17 हजार लाभार्थ्यांचे आधार सीडिंग बाकी असून ते तातडीने पूर्ण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. जे लाभार्थी अस्तित्वात नाहीत, दोन ते तीन महिन्यांपासून धान्याची उचल केलेली नाही, अशा सर्व लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी धुळे जिल्ह्यात करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानदारांसमवेत बैठक घेत त्यांना माहिती आणि प्रशिक्षण दिले आहे.  तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी व पुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सकाळी 8 ते दुपारी 12  व दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत स्वस्त धान्य दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वत:हून लाभार्थ्यांशी संपर्क करुन हे काम मुदतीत पूर्ण करावयाचे आहे. या  कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी दिल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने