*शिरपूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नव्हे ती मुसंडी घेत 9 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपला झेंडा रोवला आहे.* तर काही ग्रामपंचायत वर अवघ्या एक दोन जागांनी निसटता पराभव झाला आहे.
हिंगोणी, शेमल्या, बाळदे, टेकवाडे, साकवद, बाभुळदे, जवखेडा, बलकुवा, उपरपिंड, या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्यात यश आले. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले शिंगावे आणि हिंगोणी ग्रामपंचायत पैकी शिंगावे येथे राष्ट्रवादी चे शिरीष पाटील यांच्या नेतृत्वाखाली 6 जागांवर विजय मिळवला मात्र एक जागेअभावी सत्ता हुकली . तर डॉ जितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक असलेले आणि शिरपूर बाजार समितीतील लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे हिंगोणीचे मिलिंद दौलतराव पाटील यांनी सर्वच्या सर्व 7 जागांवर दणदणीत विजय मिळवला. डॉ जितेंद्र ठाकूर यांचे शेमल्या येथील आदिवासी भागातील खंदे समर्थक शेमल्या येथील कैलास पावरा, सखाराम पावरा, गोटीराम पावरा यांचे 9 सदस्य निवडून येऊन शेमल्या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला गेला. टेकवाडे येथे किशोर शिरसाठ, दिलीप धनगर, दुर्गेश पटेल यांनी 40 वर्षांपासूनची सत्ता उलथवून लावत सर्व जागांवर विजय मिळवला. दहिवद येथे विकास कामांची नोटरी करून देऊन संपूर्ण जिल्ह्यात ज्यांनी सोशल मिडिया गाजवला ते मयुर राजपूत यांनी प्रस्थापितांना धक्का देत विजय मिळवला. बाभूळदे येथे योगेश महाजन यांचे सहकारी यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. बलकुवा येथे पँनल प्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप चव्हाण यांनी 7 जागा मिळवत सत्ता मिळवली. तसेच जवखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा संघटक प्रफुल पाटील यांच्या सहकाऱ्यांनी सर्व जागांवर विजय मिळवला. साकवद येथे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर राजपूत, दत्तू भील यांचे पँनल निवडून आले आहे. डॉ जितेंद्र ठाकूर यांचे अनेक समर्थक यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढत चालली आहे.
यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ जितेंद्र ठाकूर, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण महाजन, बंसीलाल चौधरी, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आशिषकुमार अहिरे, प्रशांत वाघ, शाम पाटील यांनी अभिनंदन केले.
Tags
news