जिल्हा रुग्णालयाने नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू करावेत : जिल्हाधिकारी संजय यादव



मास्क न वापरणाऱ्यांवर महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी

धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील नॉन कोविड रुग्णांवर धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील आठवड्यापासून उपचार सुरू करावेत, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपाययोजना यासंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.   
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असताना नागरिकांमधील गांभीर्य कमी होताना दिसत आहे. अनेकजण विना मास्क फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलिस दलाने संयुक्तपणे कारवाई करून संबंधितांकडून दंड वसूल करावा. तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करावी. कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी करावी.
आरोग्य विभागाने कोरोना विषाणूनेबाधित आणि आता बरे झालेल्या रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्यावरील उपचारांचा पाठपुरावा करावा. त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होईल, असे नियोजन करावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी नियोजन करावे. तसेच कोरोना विषाणूच्या संभाव्य लसीकरणाच्या पूर्वतयारीच्या नियोजनाला वेग द्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. 
आयुक्त श्री. शेख म्हणाले, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना विषाणूच्या रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी धुळे शहरात ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. आता पोलिसांच्या मदतीने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. डॉ. पाटील, डॉ. शेजवळ यांनी कोरोना बाधित रुग्ण व नॉन कोविड रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने