लॉकडाऊनचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढविला

 



     धुळे, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

धुळे जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला होता. आता धुळे जिल्ह्यासाठी शासनाकडून वेळोवेळी शिथिल केलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवून लॉकडाऊनचा कालावधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील.  या  आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार  शिक्षेस  संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने