धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. धुळे जिल्ह्यात चार तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात येईल. तेथे आरोग्य विभागाने वैद्यकीय पथक नियुक्त करावे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहावे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देतानाच वैद्यकीय पथक मतदानाच्या कालावधीसाठी नियुक्त करावे. उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.
Tags
news
