धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यातून रेल्वे आणि रस्ते मार्गाने धुळे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना विषाणूची (COVID19) चाचणी करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.
धुळे जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या 30 सप्टेंबर 2020 मध्ये नमूद बाबी धुळे जिल्ह्याकरीता लागू करण्यात आल्या आहेत. तसेच राज्य शासनाच्या 23 नोव्हेंबर 2020 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात विमान, रेल्वे व रस्त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 25 नोव्हेंबर 2020 पासून धुळे जिल्ह्यात रेल्वे व रस्त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर पुढील प्रमाणे निर्बंध लागू केले आहेत. ते असे :
रेल्वेद्वारे प्रवास करण्याबाबत : दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून धुळे जिल्ह्यात रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांनी RT_PCR चाचणी केल्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. रेल्वेने महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या 96 तासांच्या आत RT_PCR चाचणी करीता नमुने घेण्यात यावेत. ज्या प्रवाशांकडे RT_PCR चाचणी केल्याचा अहवाल नसेल, अशा प्रवाशांची स्क्रीनिंग करुन तापमान मोजावे. त्याची जबाबदारी रेल्वे विभागाची राहील. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील. लक्षणे असलेल्या प्रवाशांना विलगीकरण करावे. त्यांची Antigen चाचणी करावी. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह (Negative) आल्यास, अशा प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील. जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा बाधित आढळून आल्यास, अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या Covid Care Centre (CCC) मध्ये भरती करावे. त्याबाबतचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसूल करावा.
रस्त्याने प्रवास करण्याबाबत : दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून धुळे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करुन तापमान मोजण्याकरीता हाडाखेड, ता. शिरपूर, कोंडाईबारी, ता. साक्री येथील सीमेवर तपासणी पथकाची (24X7) स्थापना करण्याबाबत संबंधित तहसीलदारांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. ज्या प्रवाशांना लक्षणे आहेत, अशा प्रवाशांना परत माघारी जाण्याचा पर्याय असेल. लक्षणे असलेल्या प्रवाशांची Antigen चाचणी करावी. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह (Negative) आल्यास अशा प्रवाशांना प्रवासाची मुभा राहील. जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा बाधित आढळून आल्यास, अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या Covid Care Centre (CCC) मध्ये भरती करावे. याबाबतचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसूल करावा.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
news
